| मुरूड | वार्ताहर |
सोमवारपासून परतीच्या पावसाचा खेळ सुरू झाला आहे. मागील आठवड्यात मुरूड समुद्रात मोठ्या प्रमाणात लाल रंगाची टायनी कोळंबी मच्छिमारांना मिळाली होती. गेले दोन दिवस पावसामुळे कोलंबी मासळी मिळेनाशी झाल्याने एकदरा, मुरूड, राजपुरी येथील नौका नांगरण्यात आल्या; मात्र बुधवारी सकाळी (दि. 25) किमान 35 नौका पुन्हा कोळंबी मासेमारीस गेल्याचे दिसून आले. या नौका दिवसात पहाटेपासून दोन वेळा मासेमारीस जात असतात.
अनेक मच्छिमारांनी सांगितले की, सध्या पद्मजलदुर्गाजवळ कोळंबी मोठ्या प्रमाणावर मिळत असताना अचानक परतीच्या पावसाचा मोठा अडसर निर्माण होत असून, आमचे मोठे नुकसान होत आहे. सकाळी आकाश निरभ्र तर दुपारी, सायंकाळी आभाळ भरून पाऊस सुरू होतोय. वादळी वारेदेखील सुटत असतात. या मासेमारीत कधी सोलट कोळंबी, तर कधी टायनी किंवा चैती जातीची कोळंबी सापडत आहे. निश्चित भरोसा नाही. नाखवा रोहन निशानदार यांनी सांगितले की, टायनी कोळंबीचा किलोचा दर रू 30/- आहे. सोलट मिळाली तर 500/- किलोचा भाव मिळतो. पर्यटक नसल्याने कोळंबीला उठाव दिसून येत नाही. स्थानिकांची चंगळ होते. तरीही कोळंबी खाऊनदेखील सर्वजण कंटाळलेलेदेखील दिसून येत आहेत. पापलेट, जिताडा, रावस, सुरमईसारखी मासळी अजून तरी मुरूड मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आलेली दिसून येत नाही.
गेल्या आठवड्यापासून किनारी मोठ्या प्रमाणात कोळंबी येत असली तरी पावसाचा अडसर आल्यास कोळंबी खोल समुद्रात उबदार पाण्यात जात असते. त्यामुळे ती जाळ्यात मिळत नाही, अशी माहिती मुरूड सागरकन्या मच्छिमार सहकारी सोसायटी चेअरमन मनोहर बैले यांनी दिली.