| आगरदांडा | वार्ताहर |
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मुरुड अलंकापुरी येथील ऐतिहासिक भूमीत भव्य स्मारकाचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. डॉ. बाबासाहेबांच्या अनुनायांसह सर्व तालुक्यांतील जनतेला हे स्मारक मानवतेचा संदेश देणार असून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या त्रिसूत्रीचा वस्तुपाठ देणारे एक शक्तीपीठ म्हणून अखंड प्रेरणादायी ठरेल.
मुरुड भेटीच्या प्रेरणेने मुरुड तालुका बौद्धजन सेवा मंडळाने मुरुड शहरात बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. या स्मारकामध्ये प्रशिक्षण केंद्र, सुशिक्षित-अशिक्षित महिला, युवा, कामगार, दुर्बल व अपंग-दिव्यांग घटक यांना स्वावलंबी होण्याकरिता विविध रोजगाराभिमुख विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमासाठी सर्व सुविधायुक्त भव्य सभागृह. सर्व सुविधायुक्त वसतीगृह, विपश्यना केंद्र, वस्तुसंग्राहलय, ग्रंथालय-वाचनालय, व्यसनमुक्ती केंद्र अत्याधुनिक व्यायामशाळा आदी उभारले जाणार आहेत. ठेकेदार मुसव्विर जमादार यांनी सांगितले की, लवकरात लवकर काम पुर्ण होण्यासाठी रोज 150 कामगार काम करीत आहेत. 8 ते 10 दिवसात काम पुर्ण करण्याचा प्रयत्न आहे.