। कोर्लई । वार्ताहर ।
रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाचा मुरुड तालुक्याला फटका बसला आहे. अतिवृष्टिमुळे साळाव-मुरुड रस्त्यावरील चिकणी पूल खचला असून अनेक ठिकाणी डोंगर भागातून रस्त्यावर माती वाहून आली आहे. तसेच, उसरोली-आदाड, खारदोडकुले गावात पाणी शिरले असून एकदरा गावात मध्यरात्री संरक्षण भिंत पडली आहे. तर, सावली गावानजीक रस्त्यावर दरड कोसळून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
गेले दोन दिवस तालुक्यात पावसाने दमदार जोर धरला असून रविवारी मध्यरात्रीपासून पडत असलेल्या जोरदार पावसाचा मुरुड तालुक्याला फटका बसला आहे. यावेळी तालुक्यात कालपासून 255 मि.मि. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील उसरोली हद्दीतील खारदोडकुले, खारिकावाडा, आदाड, वाळवटी, व उसरोली या गावांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे.
तालुक्यात मध्यरात्रीपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे खारदोडकुले येथील 60 ते 62 घरांमध्ये, शिघ्रे येथील 70 ते 72 घरांमध्ये तसेच वाळवटी गंधील, चोरढे येथील घरांमध्ये पाणी भरल्याने घरातील वस्तूंचे नुकसान झाले आहे. तसेच, चिकणी येथील नाल्यामध्ये नंदकुमार दिवेकर यांची बैलगाडी वाहून गेली असून बोर्ली येथील रिक्षावर माडाचे झाडपडून रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.