। रायगड । वार्ताहर ।
पाली सुधागडात पावसाने हाहाकार माजवला आहे. सर्वत्र पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून नद्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले.
अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली परिणामी गुरुवारी (ता.25) पहाटे दोन वाजल्यापासून वाकण पाली खोपोली राज्य महामार्गावरील पाली अंबा नदी पुलापासून दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली होती. दुपारी दोन नंतर देखील ही वाहतूक ठप्प होती. तसेच अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
पाली अंबा नदी पुलाजवळ दोन्ही बाजूला जोड रस्त्यावर सखल भागात पाणी भरले होते. हे पाणी पाली मिनीडोअर स्टॅन्ड तसेच उन्हेरे फाटा इथपर्यंत आले होते. यामुळे येथील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प होती. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. तसेच याच मार्गावर खोपोली बाजूकडे मोर टाक्याजवळ देखील रस्त्यावर पाणी साचल्याने तेथेही वाहतूक खोळंबली होती. दुपारी बारा नंतर पाणी ओसरल्यावर येथून वाहतूक सुरू झाली. मात्र पाली अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर पाणी असल्यामुळे ही वाहने पुन्हा त्या ठिकाणी अडकून पडली. यावेळी खाजगी वाहने, एसटी बस, ट्रक टेम्पो आदी मालवाहू वाहने दुचाकीस्वार व प्रवासी व चाकरमानी अडकून पडले होते.
वीज पुरवठा खंडित, इंटरनेट सेवा ठप्प
सकाळपासूनच पालीसह इतर गावातील काही ठिकाचा विजपुरवठा खंडित झाला होता. याशिवाय सर्व ठिकाणचे मोबाईल नेटवर्क तसेच इंटरनेटचे नेटवर्क स्लो झाले होते. तर काही कंपन्याचे नेटवर्क गुल देखील झाले. यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.