‘तिसर्‍या मुंबई’वर हरकतींचा पाऊस

शेतकरी देशोधडीला लागणार असल्याच्या भावना

| हमरापूर | वार्ताहर |

एमएमआरडीएने घोषित केलेल्या तिसर्‍या मुंबईला (नवनगर प्रकल्पाला) पनवेल, उरण व पेण या तिन्ही तालुक्यांतील विरोध वाढला आहे. आतापर्यंत हजारांवर हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. या तिन्ही तालुक्यांत मोठा विरोध या प्रकल्पाला होत आहे.

अ‍ॅड. अच्युत पाटील, शेतकरी सामाजिक विकास संस्था पेणचे अध्यक्ष अंनत पाटील, कॉ. भूषण पाटील, सुधाकर पाटील यांनी पेण तालुक्यातील आंबिवली, बळवळी, कांदळे, उचेडे, वाशी, वढाव, बोरी, शिर्की, हमरापूर भाग आदी गावांत विभागवार बैठका घेतल्या. या प्रकल्पाचे नियोजन करीत अटल सेतूचा खर्च भरून काढण्यासाठी शासन शेतकर्‍यांच्या जमिनी बळाकावत असल्याचा आरोप केला आहे. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, शेतकर्‍यांच्या एकजुटीचा विजय असो, घोषणा देत शेतकर्‍यांनीही याला विरोध केला आहे.

पनवेल, उरणमधूनदेखील हजारो हरकती दाखल झाल्या आहेत. पेणमध्ये गेले दोन दिवस 78 गावांत या प्रकल्पाला विरोध दाखवला असून, दहा हजार हरकती जमा केल्या आहेत. अजूनही या तिन्ही तालुक्यातून हरकतींत वाढ होत आहे. राज्य सरकारने एमएमआरडीएच्या माध्यमातून शिवडी व न्हावाशेवाला जोडणारा अटल सेतू विकसित केल्यानंतर तिसरी मुंबई प्रकल्प विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पनवेल, उरण व पेण तालुक्यांतील 124 गावांमधील 324 चौरस किलोमीटर क्षेत्राचा विकास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 4 मार्च रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

कर्जबाजारी झालेल्या एमएमआरडीएच्या तिजोरीत खडखडाट आहे. अटल सेतूचा खर्च वसूल करण्यासाठी पेण, उरण व पनवेलमधील 124 गावांच्या शेतजमिनी संपादित करून शेतकर्‍यांना उद्ध्वस्त करणारा प्रकल्प पेणच्या शेतकरी कदापि मान्य करणार नाही, अशी प्रतिक्रिया अ‍ॅड. अच्युत पाटील, अनंत पाटील, कॉ. भूषण पाटील यांनी दिली. येथील शेतकरी आता जागरुक झाला असून, या प्रकल्पामुळे देशोधडीला लागणार असल्याची भीती वाटत आहे. त्यामुळे आतापर्यंत हजारो हरकती शेतकर्‍यांनी एमएमआरडीकडे दाखल केल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत आम्हाला हा प्रकल्प नको, अशा प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Exit mobile version