क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ आहे. मैदानावरील क्रिकेट रसिकांना धावांचा वर्षाव पहायला आवडते. चौकार-षटकारांचा वर्षाव पहायला आवडते. मैदानावरील हिरवळीला अंगा-खांद्यांवरून सीमारेषेपलीकडे जाणारे चेंडू अनुभवायला आवडते. मैदानावरच्या गवताला सुसाट वेगाने जाणाऱ्या चेंडूंचा स्पर्श अनुभवायला आवडते. सातत्याने पडणाऱ्या विकेट पहायला कुणालाही आवडत नाही. गोलंदाजाने घेतलेल्या हॅटट्रिकपेक्षाही शतकाला टाळ्या अधिक पडतात. विकेटपेक्षाही षटकाराला मिळणारी दाद अधिक उत्साही असते.
चौकार-षटकार स्टेडियमवरच्या प्रेक्षकांचे चेहरे आनंदाने खुलवितात. यंदाचा विश्वचषक प्रेक्षकांना तोच आनंद देणारा असेल. त्याची चुणूक आपण विश्वचषकाच्या सर्व सामन्यात पाहिली. चार वर्षांपूर्वी लॉर्डसला झुंजलेल्या इंग्लंड व न्यूझीलंड या संघांच्या यंदाच्या सामन्यात इंग्लंडच्या 282 धावसंख्येला न्यूझीलंडने अगदी एक-विकेट गमावून प्रत्युत्तर दिले. कॉन्वे आणि नवोदित रचिन रविंद्र यांच्या शतकांच्या झंझावातांमुळे विजयी धावसंख्या 37 व्या षटकात गाठली गेली. म्हणजे त्या सामन्यात 400 धावादेखील कमी पडल्या असत्या असे वाटत होते. हैदराबादला तर धावांचा धबधबाच कोसळत होता. श्रीलंकेच्या 344 धावसंख्येपुढे दबून जाण्याऐवजी पाकिस्तानने धावसंख्या 6 विकेट राखून गाठली. त्याआधी पाकिस्तानने हॉलंडविरूद्ध-खराब सुरूवातीनंतर 286 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. दिल्लीच्या कोटला मैदानावर तर दक्षिण आफ्रिकेने 428 धावांची लयलूट केली. प्रत्युत्तर देताना नवोदित श्रीलंकेने देखील 326 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. पहिल्या सामन्यानंतर धरमशालाच्या खेळपट्टीनेही कात टाकली आणि इंग्लंडला 364 धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. चेन्नईच्या खेळपट्टीचा अपवाद आहे. ही खेळपट्टी संथ आहे. खेळपट्टीवरची माती निघायला लागते. भारताविरूद्ध-ऑट्रेलियाला त्यामुळे 199 धावसंख्याच उभारता आली. यानंतरच्या सामन्यात देखील काही सुधारणा होईल असे वाटत नाही.
मात्र, यंदाच्या विश्वचषकात चांगल्या, स्पोर्टिंग विकेट देण्याची आयसीसीची कल्पना प्रत्यक्षात उतरताना दिसतेय. खेळपट्टया जर चांगल्या असतील तर फलंदाज देखील आपल्या खेळाला न्याय देऊ शकतात. आपल्या पोतडीतील फटके बाहेर काढण्यासाठी त्यांना खेळपट्टीकडून दर्जाची हमी आवश्यक असते. एकदा का तो विश्वास खेळपट्टीकडून मिळाला की मग फलंदाजीची मैफल हळूहळू रंगायला लागते. तशी मैफल सोमवारी हैद्रबादला रंगली. आधी कुशल मेंडिसने आपली शतकी मैफल रंगविली. यष्टीरक्षक फलंदाज अशा दुहेरी लाभाच्या श्रेणीतील मेंडिसने यष्टीपुढे आणि यष्टीपाठी आपली रागदारी पेश केली. 6 षटकार व 14 चौकारांची 77 चेंडूतील ही स्फोटक खेळी संपते न संपते तोच समरविदुमाने क्रिकेट रसिकांना शतकी नजराणा पेश केला. 344 धावांचे आव्हान 2 बाद 37 नंतर पाकिस्तानला पेलविणार नाही असे वाटत होते. पण अब्दुल शकिपा आणि महमद रिझवान या दोन शतकवीरांच्या डोक्यात काहीतरी वेगळेच शिजत होते. यष्टीपाठी चमक दाखविल्यानंतर रिझवान बॅट तळपली. शतकाच्या जवळ आल्यानंतर पायात गोळे आल्यावर तो जमिनीवर कोसळला. पण, मैदान सोडून गेला नाही. पाकिस्तानचा विजय साजरा होईपर्यंत खेळपट्टीवर चिकटून राहिला. दरम्यान त्यानेही शतक झळकविले. सामन्यात 4 शतके आणि दोन्ही संघाच्या यष्टीरक्षकांची त्यापैकी दोन शतके. यंदाच्या विश्वचषकातील यष्टरिक्षक-फलंदाज ही जोड कामगिरी अधिक प्रभावी ठरताना दिसतेय.
प्रत्येक संघ अशा खेळपट्टया मिळाल्यामुळे आपल्या फलंदाजीच्या शिलेदारांना मुक्त फटकेबाजीची मुभा देत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या फटक्यांची पोतडी उघडायला सुरूवात केली आहे. त्यामुळे दोन्ही डावात मोठमोठ्या धावसंख्य होताना दिसताहेत. पहिल्या डावातील मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायला आता कोणताही संघ पूर्वीप्रमाणे घाबरताना दिसत नाही. धावांच्या आव्हानाला सर्वच संघ बिनधास्तपणे सामोरे जाताना दिसताहेत. ही तर सुरूवात आहे…