तब्बल 300 गड-किल्ल्यांचे दर्शन; महाडमध्ये स्वागत
| महाड | वार्ताहर |
छत्रपती शिवरायांच्या विचारांनी आणि इतिहासाने अनेकजण प्रेरित होऊन विविध उपक्रम राबवीत असतात. केरळ राज्यातील एका अवलीयाने 17 हजार किलो मीटरचा सायकल प्रवास करत महाराज्यांच्या तीनशेहून अधिक गडकिल्ल्यांचे दर्शन घेतले आहे.
एम.के.हमरास (जुने नाव) आत्ताचे नाव शिवराज गायकवाड असे त्यांचे नाव आहे. ते बुधवारी महाड शहरात आले होते. तालुक्यातील शिवप्रेमी संघटना, सामाजिक संघटनेसह नागरिकांनी त्यांचे सन्मानपूर्वक स्वागत केले. शिवराज हे पेशाने चालक आहेत. ते काही काळ परदेशात नोकरी करीत होते. सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असणाऱ्या या तरुणाने प्रसारमाध्यमांवर छत्रपती शिवरायांचे चरित्र व ऐतिहासिक गडकिल्ल्यांची माहिती पाहिली होती. त्यातून ते प्रभावित झाले. त्यापासून प्रेरणा घेत हे सर्व गडकिल्ले सायकल सफर करून पाहण्याचा त्यांनी चंग बांधला. त्यानुसार 1 मे 2022 पासून केरळमधून या मोहिमेस त्यांनी सुरुवात करत कर्नाटकमार्गे महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यांनी सर्वप्रथम किल्ले प्रतापगडाचे दर्शन घेतले. त्यावेळी महाराजांचे वंशज साताऱ्याचे छत्रपती संभाजी राजे, छत्रपती उदयनराजे यांनी देखील या तरुणाच्या ध्येयाचे कौतुक केले, तसेच त्याच्या मोहिमेला शुभेच्छा देऊन विशेष सहकार्य देखील केले.
आत्तापर्यंत त्यांनी 321 गडकिल्ल्यांचे दर्शन घेतले आहे. महाड येथे त्यांनी सोनगड या गडाचे दर्शन घेतले. यानंतर उर्वरित पन्नास गडकिल्ले पाहण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी तेथून मार्गक्रमण केले. या मोहिमेची सांगता स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाचे दर्शन घेऊन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जून 2024 रोजी राज्याभिषेक सोहळ्यानिमित्ताने त्यांची ही ध्येयपूर्ती होईल, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.