अलिबाग तालुक्यात पावसाचा शिडकाव

। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील नागांवसह काही गावांमध्ये गुरुवारी (दि.2) पहाटे पावसाने हजेरी लावली. गेले काही दिवस तालुक्याचे तापमान वाढले होते. त्यामुळे पावसाच्या हजेरीने हवेत गारवा निर्माण झाला असून नागरिकांसह बळीराजाही सुखावला आहे.
हवामान खात्याने यंदा लवकर मान्सून येणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकणात पावसाचे आगमन होईल असेही सांगण्यात आले होते. पण तत्पूर्वीच जुन महिन्याच्या पहिल्याच दिवशी अलिबागमधील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी कमी जास्त पाऊस बरसला.
गुरुवारी नागाव येथे पडलेल्या पावसामुळे काही काळ विद्यूत पुरवठादेखील खंडीत झाला होता. पावसाचे आगमन लवकरच होणार असल्याने शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. अशातच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गाच्या आशा काहीअंशी पल्लवित झाल्या.
हवामान विभागाच्या माहितीनूसार पुढच्या दोन दिवसांत मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. एरव्ही 7 जूनला महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून यावर्षी तीन-चार दिवस आधीच कोकणात दाखल झाला आहे.

बळीराजा सज्ज
जिल्ह्यात काही दिवसांपासून वार्‍याचा वेग वाढला आहे. तापमानातही घट झाली आहे. तापमानाने हैराण झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. याशिवाय पेरणीसाठी सर्वच शेतकर्‍यांनी शेते तयार करून ठेवली आहेत. आता त्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. पाऊस पडल्याने शेतातील जमिनीतील उष्णता जाऊन जमीन गार होते. शेतातील मातीचे मोठे खडे विरघळून जातील. त्यानंतर नांगरणी करून शेत पेरणी योग्य बनविता येणार आहे.

Exit mobile version