थंडीच्या दिवसात पावसाच्या सरी

रब्बी पिकांचे मोठे नुकसान
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
मागील वर्षभरापासून ऋतुचक्र पूर्णपणे बदलले आहे. कधी उन्हाळ्यात पाऊस, तर कधी पावसाळ्यात कडक उन्ह तर हिवाळ्यात मुसळधार पाऊस अशी वातावरणातील परिस्थिती व हवामानबदल ऋतुचक्र बदलल्याचे संकेत देत आहे. सुधागड पाली सह जिल्ह्यात ऐन थंडीच्या दिवसात पावसाने हजेरी लावली व हवेत प्रचंड गारवा निर्माण केला. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं. त्यानंतर बुधवारी सकाळपासून पाली सुधागड, परळी, जांभूळ पाडा, नांदगाव, शिहू, बेणसे ,चोळे गांधे, झोतिरपाडा, कुहिरे, कडसुरे, आंबेघर, वणी, यासह काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला आहे. मात्र रब्बी पिकांचे यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान बदलाचा सर्वात मोठा फटका शेतकरी वर्गाला बसणार आहे.


अवकाळी पावसाची सुरूवात
वातावरणातील वारंवार होणारे बदल व सततच्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी हतबल होऊन मोठ्या चिंतेत पडला आहे. त्याचप्रमाणे बुधवारी (दि.1) सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे घरांमध्ये पॅकिंग करून ठेवलेल्या छत्र्या व रेनकोट पुन्हा एकदा घराबाहेर काढाव्या लागल्या आहेत. तसेच वातावरणात दिवसभर गारवा निर्माण झाल्यामुळे अनेकांनी घरामध्येच थांबणे पसंद केले. सद्यस्थितीत हवामान खात्याच्या माहितीनुसार जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस हा अजून तीन ते चार दिवस राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या अवकाळी पावसामुळे वाल जमिनीसह, मुग, मटकी, चवळी, तुर या पिकांची देखिल मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

Exit mobile version