। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायतीमध्ये सध्या प्रशासकीय राजवट आहे. या ग्रामपंचायतीमधील माणगाव तर्फे वरेडी गावातील आदिवासीवाडीत जाणार्या रस्त्याला सिमेंटचे गटार बांधण्यात आले नाही. त्याचवेळी या रस्त्याच्या बाजूला खोदकाम करून गटार बांधण्यात आले नसल्याने गटारातून वाहणारे पाणी थेट स्थानिकांच्या अंगणात तर काही घरांच्या पायरीवर पोहचले आहे. याबाबत माणगाव ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
माणगावमधील आदिवासी वस्तीकडे जाणार्या रस्त्यावर ग्रामपंचायतीने मागील वर्षी सिमेंट काँक्रिटचा रस्ता बनवला. हा रस्ता पुढे स्मशानभूमीकडे जातो. त्यात या रस्त्यावर उतार भाग असल्याने पावसाळ्यात पाणी कोठेही न थांबता मंदिराकडे येत असते. मात्र ते पाणी कोणालाही अडथळा न होता खाली येण्यासाठी गटार असणे आवश्यक आहे. मात्र काँक्रिटचा रस्ता बनवला पण आरसीसी गटार बांधले नाही. आरसीसी गटार बांधण्यास त्यावेळी तरतूद नव्हती, अशी माहिती ग्रामपंचायतीचे माजी सदस्य शरद देशमुख यांनी दिली. परंतु रस्ता केल्यानंतर तात्काळ रस्त्याच्या बाजूने जेसीबी मशीनच्या सहाय्याने गटार खोदून देणे आवश्यक बाब होती.
माणगाव तर्फे वरेडीमधील आदिवासीवाडीच्या बाजूने बनवलेल्या रस्त्याच्या बाजूला कोणत्याही प्रकारचे गटार बनवले नाही. त्यामुळे पावसाळयात पावसाचे पाणी आणि उन्हाळ्यातदेखील सांडपाणी हे रस्त्यावरून वाहून जाते. सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे आदिवासींच्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली असून लवकरात लवकर गटार खोदण्याची मागणी केली आहे.