भारत,आयर्लंडच्या अखेरच्या सामन्यावर पावसाचे पाणी

| डब्लिन | वृत्तसंस्था |

भारत आणि आयर्लंड यांच्यातील अखेरचा तिसरा टी-20 सामना कोणत्याही प्रकारचा खेळ न होता पावसामुळे वाया गेला.त्यामुळे भारताने ही मालिका 2-0 अशी जिंकली. तिसऱ्या टी-20 सामन्यात सातत्याने पावसाचा व्यत्यय येत होता. त्यामुळे नाणेफेक उशिरा होईल, असे जाहीर करण्यात आले होते. पण पावसाचा जोर काही कमी होत पाऊस थांबल्यावर मैदान लवकरात लवकर सुकवण्याची व्यवस्था होती. त्यामुळे पाऊस थांबल्यावर लगेच हा सामना सुरु होऊ शकते, असे म्हटले जात होते. पण पाऊस काही थांबला नाही. त्यामुळे हा सामना अखेर पावसामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी भारत आणि आयर्लंड यांच्यात सात सामने खेळवले होते, या सातही सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला होता. पण हा आठवा सामान असा आहे जो रद्द झाला आहे. त्यामुळे हा भारत आणि आयर्लंडमध्ये निकाल लागू न शकलेला पहिला सामना ठरला आहे. हा सामना रद्द झाल्यामुळे भारताने ही मालिका 2-0 अशी जिंकली आहे.

भारतासाठी हा सामना सराव करण्यासाठी फार महत्वाचा होता. कारण आता या सामन्यानंतर भारताला थेट आशिया चषकात उतरायचे आहे. त्याचबरोबर या सामन्यात संघातील युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे. यामध्ये जितेश शर्मा, अवेश खान आणि शाहबाझ अहमद सारख्या युवा खेळाडूंचा समावेश होता.सॅमसनला विश्रांती देत जितेश शर्माला अंतिम अकरामध्ये खेळविण्याचा विचार केला गेला असता, कारण त्यामुळे जितेशला एशियाडपूर्वी आंतरराष्ट्रीय सामन्याचा अनुभव मिळाला असता. रिंकू सिंह, यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड भारताच्या टी-20 संघातील आपले स्थान अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न या सामन्यात करू शकले असते. पण पावसाने मात्र सगळा घोळ केला आणि भारताच्या खेळाडूंच्या आशेवर पाणी फिरवले. त्यामुळे आता आशिया चषकात भारतीय संघ थेट पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये या युवा खेळाडूंना संधी मात्र मिळालेली नाही.

Exit mobile version