| मुंबई | क्रीडा प्रतिनिधी |
18 वर्षाखालील मुले व मुलींच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा उत्तर प्रदेशमधील हरिद्वार येथे पार पडत आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेच्या उप उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राच्या मुलींनी मध्य प्रदेशचा 34-14 असा पाडाव केला. झंझावाती सुरुवात करीत पूर्वार्धात 26-08 अशी आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राने उत्तरार्धात सावध खेळ करीत विजयाला गवसणी घातली. सेरेना म्हस्करचा अष्टपैलू खेळ तिला संतोषी थोरवेची मिळालेली चढाईची, तर सानिका वाकसे, पूजा चिंदरकर यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे हे सहज शक्य झाले. मध्य प्रदेशचा प्रतिकार अत्यंत दुबळा ठरला. या अगोदर झालेल्या ‘इ’ गटातील साखळीतील शेवटच्या सामन्यात महाराष्ट्राने छत्तीसगडचा प्रतिकार 45-34 असा मोडून काढला. विश्रांतीला महाराष्ट्र 19-22 अशा 03 गुणांनी पिछाडीवर होते. विश्रांतीनंतर महाराष्ट्राने टॉप गिअर टाकत सामना आपल्या बाजूने झुकविला. सेरेना म्हसकर, बिदिशा सोनार, सानिका वाकसे यांच्या चढाई पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. महाराष्ट्राने गटात प्रथम क्रमांक मिळवित बाद फेरी गाठली.