वीजपुरवठा खंडित
अलिबाग । विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात 5 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत काही ठिकाणी विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली असून, यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व यंत्रणांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कततेचा इशारा देण्यात आला आहे.
अलिबागमध्ये मंगळवारी (5 ऑक्टोबर) सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून अचानक वातावरणात बदल होऊन पावसाला सुरुवात झाली. विजांचा प्रचंड कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरु आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे रस्त्यावरील नागरिकांनी दुकानांच्या शेडचा आसरा घेतला, तर खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता.
जिल्हा प्रशासनाने केलेल्या सूचना :
5 ते 8 ऑक्टोबर या काळात ढगांच्या गडगडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता राहील.
नागरिकांनी शेतात काम करताना झाडाखाली थांबू नये.
विजा चमकत असताना विद्युत खांब, झाडे, पाणी, लोखंडी वस्तू, साहित्य यापासून सुरक्षित अंतर ठेवावे.
कच्च्या घरातील नागरिकांनी घराचे छप्पर व हलक्याफुलक्या वस्तूंची काळजी घ्यावी. त्या उडून नुकसान होऊ शकते.
अधिक माहिती व मदतीसाठी जवळच्या तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.
कोणत्याही घटनांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्षास 02141 222097 व जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षास 02141 228473 या क्रमांकावर द्यावी.