सतरा वर्षांचे रेकॉर्ड मोडण्याची शक्यता
| महाड | प्रतिनिधी |
तालुक्यात दरवर्षी पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे वित्तहानी तर होते. मात्र जीवितहानीच्या भीतीपोटी महाडकर आपला जीव मुठीत धरून बसलेले असताना सन 2005 ते 2022 या 17 वर्षांच्या काळात पडलेल्या पावसाचे प्रमाण बघता चालू वर्षी पाऊस रेकॉर्ड ब्रेक करणार का? याची चिंता महाडकरांना लागली आहे.
सन 2005 ते 2022 या 17 वर्षांचा महाड तालुक्यात पडणारा पावसाचे अनुमान बघतात अठराव्या वर्षाचा पाऊस महाड तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक पडणार का, अशी शंका दोन दिवसांपूर्वी महाडमध्ये आलेल्या पुराच्या पाण्यामुळे नागरिकांकडून व्यक्त केली. मागील वर्षापेक्षा चालू वर्षी एक महिना उशिरा आलेला पाऊस वार्षिक सरासरी मात्र भरून काढणार याबाबत हवामान विभागाकडून जरी ठोस माहिती उपलब्ध नसली तरी ज्यांनी महाड तालुक्यात पडणाऱ्या पावसाचा अनुभव घेतला आहे, अशी जुनी जाणती मंडळी मात्र पाऊस आपली सरासरी भरून काढेल, असे ठामपणे सांगत आहेत.
महाड तालुक्यात सन 1994 ते 2021 या 27 वर्षाच्या काळात तालुक्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीमुळे दरड कोसळून 290 जणांचे प्राण गेले आहेत. 1984, 1989, 1994 व 2005 आणि 2021 या सालात महाडमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. सन 1994 ते 2021 पर्यंत महाडकारांना पुराचा सामना मोठ्या प्रमाणात करावा लागला होता. सन 2015 साली महाडजवळील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील जुन्या सावित्री पुलावरून एसटी बस नदीत कोसळून झालेल्या अपघातात 40 जणांना जलसमाधी मिळाली होती. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने महाडकारांनी पुराचा अनुभव आला आहे.
महाड तालुक्यात सन 2005 पासून आतापर्यंत सप्टेंबर या कालावधीत 2500 ते 3500 मिलिमीटर पाऊस सरासरी पडत असल्याचे मिळालेल्या शासकीय आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होऊनदेखील महाड तालुक्यातील दुर्गम खेडोपाडी एप्रिल महिन्यापासूनच पाणीटंचाई जाणवते.
सन 2005 ते 2022 या काळात पडलेला पाऊस
सन 2005 मध्ये 4223.20 मिलिमीटर, 2006 मध्ये 3031.84, 2007 मध्ये 5899.8, 2008 मध्ये 3852.6, 2009 मध्ये 2511.09, 2010 मध्ये 3321.08, 2011 मध्ये 3775.07, 2012 मध्ये 3372.0, 2013 मध्ये 3761.01, 2014 मध्ये 2601.0, 2015 मध्ये 2134.04, 2016 मध्ये 4163.0, 2017 मध्ये 3732.07, 2018 मध्ये 3422.05, 2019 मध्ये 4396.00, 2020 मध्ये 348.01, 2021 मध्ये आलेल्या महापुरात 22 जुलै रोजी 480 मिलिमीटर, 23 जुलै रोजी 594 मिलिमीटर व 24 जुलै रोजी 321 मिलिमीटर या तीन दिवसात महाड तालुक्यात 1395 मिलिमीटर पाऊस पडला. या या काळात हा पडलेला पाऊस तसेच महाबळेश्वर येथे झालेली ढगफुटी यामुळे महाड शहरात मोठ्या प्रमाणावर महापूर आला होता, तर 2021 ची वार्षिक सरासरी 3420 मिलीमीटर होती. 2022 मध्ये 3217 मिलिमीटर एवढा पाऊस पडला.