24 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
उत्तराखंडच्या डोंगराळ भागात सध्या पावसानं थैमान घातलं आहे. मंगळवारी कुमाऊं येथे पावसामुळं ढिगार्याखाली दबल्यानं आत्तापर्यंत 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सोमवारी सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळं दोन दिवसांत इथं 24 लोकांचा मृत्यू झाला आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे सचिव एस. ए. मुरुगेशन यांनी ही माहिती दिली.
मंगळवारी सकाळी नैनितालमधील रामगड जिल्ह्यात धारी तालुक्यात दोषापानी आणि तिशापानीमध्ये ढगफुटी झाली. या भागात मजुरांच्या झोपडीवर एक भिंत कोसळली. यामुळे सात जण मातीच्या ढिगार्याखाली गाडले गेले नंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दुसरीकडे खैरना येथे एका झोपडीवर दगड पडल्यानं दोन जणांचा मृत्यू झाला. चंपावतच्या तेलवाडमध्ये एका व्यक्तीचा भूस्खलनात मृत्यू झाला. तर तीन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. अद्यापही काही जण ढिगार्याखाली अडकले आहेत.
येथील कोसी नदीला पूर आल्यानं ती धोकादायक पातळीवरुन वाहत आहे. यामुळे रामनगर येथील गर्जिया मंदिराला धोका निर्माण झाला आहे. हे पाणी मंदिराच्या पायर्यांपर्यंत पोहोचलं आहे. कोसी नदीच्या पाण्याची पातळी 1,39,000 क्युसेक आहे. जी धोक्याच्या पातळीपेक्षा अधिक आहे. या ठिकाणी धोकादायक पातळी 80,000 क्युसेक इतकी आहे.