| आगरदांडा | प्रतिनिधी |
मरूड शहरात अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या पाऊस 10 जुन रोजी रात्रीच्या दरम्यान 154 मिमी पाऊस पडल्याने मशागत केलेल्या शेतात राब येऊ लागले. परंतु आज सात दिवस झाले तरी पावसाचा थेंब ही न पडल्याने त्यात सतत तापमानात वाढ होत असल्याने शेतातील आलेले राब करपण्याच्या स्थितीत दिसून येत आहे. या उकाड्याने नागरिक ही हैराण झाला आहे. नावाला पाऊस झळा मात्र उन्हाळ्याच्या बसत आहेत.
मुरूड तालुक्यात आज ही शेती हाच प्रमुख उदरनिर्वाहाचे साधन आहे. दरवर्षी भात पिकांची लागवड 3 हजार 200 हेक्टर क्षेत्रात भात पेरणी होतंय यामध्ये विविध प्रकारचे तांदूळ हेच प्रमुख पीक असते. पावसाने दडी मारल्याने पिकांची पेरणी पंचक्रोशी भागात झालेली दिसुन येत नाही. राब करपण्याच्या संभवाने दुष्काळाची चिन्ह दिसू लागल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतकरी शेताच्या बांधावर बसून मेघराजाला येरे येरे पावसा तुला देतो पैसा अशी आर्त साद घालत आहे.
मुरूड पंचक्रोशी भागात जोरदार पाऊस पडल्याने शेतातील राब उगवायला सुरुवात झाली आहे. राब वाढण्यासाठी खतांची व पाण्याची गरज आहे. सध्या आठवडा झाला तरी पाऊस पडला नाही त्यामुळे शेतातील जमीन सुकीच आहे. जर पाऊस एक दोन दिवसात नाही पडला तर आलेला राब उन्हाने करपेल आणि हिरवी झालेली भात रोपे पिवळे पडतील. आधीच दुष्काळाला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशी प्रतिक्रिया खार अंबोली येथील शेतकरी मनोज कमाने यांनी दिली.