आला पावसाळा,नागरिकानो,आरोग्य सांभाळा; जिल्हा आरोग्य यंत्रणेचे नागरिकांना आवाहन

जि.प.सीईओंकडून तयारीचा आढावा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मोसमी पावसाला आता कोणत्याही क्षणी सुरुवात होणार असल्याने त्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, आला पावसाळा,आरोग्य सांभाळा,असे आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद येथील टिपणीस सभागृहात जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांची आढावा बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती.यावेळी अधिकार्‍यांनी आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनच्या दृष्टीने महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, रोहा, श्रीवर्धन, म्हसळा व कर्जत येथे उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी अलिबाग तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिजित घासे, माता बालसंगोपन अधिकारी डॉ. वंदन पाटील, साथरोग अधिकारी श्री. दत्तात्रय विसे, जिल्हा पी. पी. एम. समन्वयक श्री. दंतराव सतीश,औषध निर्माण अधिकारी श्री. दत्तात्रेय शिंदे व जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.

आरोग्याच्या दृष्टीने लागणारा सर्व औषध साठा तपासून घ्यावा. रुग्णालयात येणार्‍या रुग्णाला तात्काळ सेवा द्यावी, मनात जिव्हाळा निर्माण करून आपल्या कुटुंबातील सदस्यांसारखी त्यांची काळजी घ्यावी. या पावसाळ्यात कुठेही जीवितहानी होणार नाही याची काळजी घ्यावी. रुग्ण कल्याण समितीच्या निधीतून रुग्णालयातील छोटी कामे, लिकेज, वायरिंग दुरुस्ती, पाण्याची सोय, वॉशरूम दुरुस्ती, ओ.टी.ची दुरुस्ती तातडीने करून घ्यावी

डॉ.किरण पाटील,सीईओ,जि.प.


सरकारी योजनांची माहिती द्या
सर्व लाभार्थ्यांना हेल्थ कार्ड देणे, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री मातृत्व योजना, अशा विविध योजनांची माहिती व लाभ द्यावा. प्रत्येक गरोदर मातांची प्रसूती शासकीय रुग्णालयात करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. गरोदर मातांच्या नातेवाईकांच्या संपर्कात राहून गरजेनुसार रुग्णवाहिका पाठवावी. साथरोग पसरू नये म्हणून उपाययोजना करावी. त्यासाठी साथ नियंत्रण कक्ष पेण, रोहा, महाड, खालापूर, सुधागड येथे स्थापित करावेत. त्यांचे मोबाईल नंबर प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपकेंद्रांत भिंतीवर ठळकपणे दिसतील अशा प्रकारे दर्शनी भागात लावावेत.
आपत्ती काळात स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन त्यांच्या सहकार्याने कामे करावीत. कामाबद्दल कोणतीही तक्रार येणार नाही याची काळजी घ्यावी असे सांगून डॉ. पाटील म्हणाले की, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात शवपेट्या व डेड बॉडी बॅगस ठेवाव्यात. ज्या ज्या ठिकाणी हे साहित्य नाही त्यांनी लगेच मागणी करून ते साहित्य घेऊन जावे. अचानक कुठेही आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास प्रत्येक तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांनी एकमेकांना संपर्क साधून गरजू व्यक्तींना तत्पर सेवा उपलब्ध करून द्यावी. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात सर्वांनी सहभागी घेऊन आपल्या जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय यांनी क्षयरुग्णांना ऊइढ देण्यासाठी त्याचे बँक अकाऊंट द्यावे. नोटिफिकेशन वाढविण्यासाठी तपासणी शिबिर घेणे, निक्षयमध्ये नोंदणी करणे, वेळेचे बंधन पाळणे, दर आठवड्यात किमान एक वेळेस वैद्यकीय अधिकार्‍यांनी सर्व कर्मचार्‍यांचा आढावा घ्यावा, जझऊ च्या प्रमाणात क्षयरोगाचे रुग्ण पाठवावेत, गावागावात जाऊन तेथील लोकप्रतिनिधीमार्फत क्षयरोगाबाबत जनजागृती करावी. आय.ई.सी. चे साहित्य त्या त्या प्राथमिक व आरोग्य उपकेंद्रांत प्रदर्शित करावे.
उपस्थित वैद्यकीय अधिकार्‍यांना सूचना देताना डॉ. पाटील यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांनी संबंधित सर्व वैद्यकीय अधिकारी-कर्मचार्‍यांची बैठक घ्यावी. त्यांनी खाजगी हॉस्पिटल, मेडिकल व लॅबला भेटी देऊन त्यांच्या कामकाजावरही विशेष लक्ष द्यावे. ई. संजीवनी पचा उपयोग करावा. त्याबद्दल सर्वांना माहिती द्यावी. जबाबदारीने कामे करावीत. कोरोना रुग्ण संख्या वाढत आहेत, त्यासाठी तपासणी केंद्र तात्काळ चालू करावेत. अँटीजनची तपासणी सुरू करावी लागेल, तशी सज्जता ठेवावी. मास्क वापरावेत आणि मास्क वापरण्यासाठी नागरिकांना सूचित करावे. मास्क चा साठा नसेल तर तो करून घ्यावा. कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, अशाही सूचना केल्या.

Exit mobile version