रस्ते जलमय,वाहतुकीची कोंडी, राब वाहून गेले
पाताळगंगा | वार्ताहर |
मागील आठवड्यापासून बरसत असलेल्या पावसाने खालापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत केले. ग्रामीण भागातही धो-धो पाऊस बरसत असल्याने गुडघाभर पाणी शेतात साचून राहिल्याने लागवडीचा खेळखंडोबा झाला आहे.त्याच बरोबर पावसाचे पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे वाहतुकीची कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
भातशेती ही पूर्ण पाण्याखाली गेली आहे.तर शेतात उपटलेले राब या पाण्याच्या प्रवाहाने वहात जात असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.जुलै च्या दुसर्या आठवड्यात भात लागवड पुर्ण होते मात्र या वर्षी वेळेवर पावसाचे आगमन न झाल्यामूळे राब तयार होण्यास विलंब झाला मात्र लागवड सुरू झाली असताना पावसाचा झिंगाट सुरु झाले.यामुळे बळीराजा चांगलाच धास्तावला आहे. तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शेती, लहान नाले जलमय झाले आहेत. दिवसभरच्या पाऊसाने या परिसरातील गावचे ओहोळ आणि बंधारे दुथडी भरून वाहत आहेत.मात्र काही ठिकाणी असलेल्या जुन्या फरशी पुलावरून पाणी जात असल्यामुळे हे पाणी रस्त्यापर्यंत पाण्याने धोक्याची पातळी पार केली आहे.