विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर वाढवा

प्रीतम म्हात्रे यांची मनपाकडे मागणी
पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी आयुक्ताकड़े केली आहे.
सध्या शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी खाजगी शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी विविध उपाय योजना करताना दिसत आहेत. याउलट पनवेल महानगरपालिकांच्या शाळांची संख्या कमी होत असून विद्यार्थ्यांची पट संख्या घसरत चालली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या शाळेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाजाची मुले शिक्षण घेतात. ह्या विद्यार्थ्याना आधुनिक शिक्षण मिळत नाही. महापालिकेच्या शाळेत प्रयोगशाळा, संगणक शिक्षण, संगीत शिक्षण, ग्रंथालय वाचनालय, क्रीडा शिक्षण, आशा अनेक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिका शाळेतील विद्यार्थी खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांच्या तुलनेने मागे पडत चालला आहे. ह्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर कायम स्वरूपी उंचावण्यासाठी नाविन्यपूर्ण योजना महिला बालकल्याण विभागामार्फत राबविण्याची अत्यंत गरज आहे,असे त्यांनी सुचित केले.
कोविड काळात पालिकेच्या शाळातील 50% विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत तर 50% विद्यार्थी मोबाईलची व्यवस्था नसल्याने वंचित आहेत. यासाठी विशेष सभेचे आयोजन करून पालिकेच्या शाळांचा शैक्षणिक स्तर वाढविण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. असे निवेदन विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यानी दिले आहे.

Exit mobile version