| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात शिंदे गट विरुध्द भाजप हा वाद वाढत असताना आता या घटनेनंतर शिंदे गटामधील गावागावांतील अंतर्गत वाददेखील चव्हाट्यावर येऊ लागला आहे. गुन्हा दाखल करण्यापर्यंत हा वाद पोहचल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेला उधाण येऊ लागले आहे. कुर्डूस परिसरात शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजा केणी आहेत. मात्र, सदस्यांमधील अंतर्गत वाद मिटविण्यास ते अपयशी ठरल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यांच्या कार्यपध्दतीवर सांशकता निर्माण होत आहे. जिल्हा प्रमुख म्हणून फुशारक्या मारणारे आणि स्थानिक पातळीवरील वाद मिटविण्यास अपयशी ठरणारे राजा केणी जिल्ह्याचा कारभार कसा सांभाळणार? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
कुर्डूस ग्रामपंचायतीची मासिक सभा मंगळवारी (दि.17) सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत शिंदे गटाचे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. ग्रामसेवक इतिवृत्त वाचत असताना छाया पिंगळे यांच्या नावे असलेल्या गट नं. 191 या जागेबाबतचा विषय आला. त्यावेळी तुषार शेरमकर यांनी या जागेवर 49 हजार रुपयांचा निधी टाका असे सांगितले. त्यावर छाया पिंगळे यांनी विरोध केल्यावर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाले. रागाच्या भरात शेरमकर यांनी खुर्ची फेकून पिंगळे यांच्या अंगावर फेकली. यामध्ये त्या जखमी झाल्या. तसेच ग्रामसेवक स्मशानभूमी दुरुस्तीचे इतिवृत्त वाचत असताना, शेरमकर यांनी त्याला पाठिंबा दिला. त्याला छाया पिंगळे व चंद्रकांत पिंगळे यांनी विरोध केला. यावरून दोन गटात भांडण झाले. एकमेकांना शिवीगाळी करून मारहाण करण्याबरोबरच ठार मारण्याची धमकी देण्यात आली.
याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे. शिंदे गटातील ग्रामपंचायत सदस्यांमध्ये झालेल्या या राड्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवार आणि पोलीस हवालदार शेरमकर करीत आहेत.