दिलीप भोईरांना दिली बांडगुळाची उपमा; भोईरांनीही केला पलटवार

लोकसभा निवडणूकीत शिवसेनेचाच उमेदवार; धैर्यशील पाटलांचा करेक्ट कार्यक्रम

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग-मुरुड-रोहा विधानसभा मतदार संघावर आपली पक्कड मजबूत करण्यासाठी शिंदे गटाने ग्रामपंचायत निवडणूकीत प्रतिष्ठा पणाला लावली. मात्र जनतेने इंडिया आघाडीला पसंती देत शिंदे गट तसेच भाजपला धूळ चारली. हार सहन न झाल्याने आक्रमक झालेले शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजा केणी यांनी थेट भाजप या मित्रपक्षाचे उपजिल्हा प्रमुख दिलीप भोईर यांच्या अब्रुची लक्तरे नाव न घेता काढली. ग्रामपंचायत निवडणूकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या बांडगुळांमुळेच शिंदे गटाला पराभव पत्करावा लागला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, लोकसभा निवडणूकीत शिवसेनेचाच उमेदवार असेल अन्यथा सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनाम देऊ, असा सज्जड इशारा देत भाजपचे धैर्यशील पाटील यांच्या अडचणीत वाढ केली आहे. रायगड जिल्ह्यात नव्याने भाजपमध्ये गेलेले काही नवे नेते हे बांडगुळ आहेत, अशी घणाघाती टीका राजा केणी यांनी केली आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध शिंदे गट असा सामना अधिक रंगतदार झाला आहे.

दिलीप भोईर शेकापचेच
अलिकडेच भाजपमध्ये गेलेले शेकापचे नेते हे शेकापचीच बी टीम असल्याची बोचरी टीका शिंदे गटाचे जिल्हाधक्ष राजा केणी यांनी केली आहे. मित्रपक्षावर केलेल्या आरोपावर आता दिलीप भोईर काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
…तर सामूहिक राजीनामे देऊ
जुने भाजप कार्यकर्त्यांनी नेहमीच युतीधर्म पाळला आहे. मात्र नव्याने आलेल्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणूकीत विश्वासघात केला आहे. येत्या लोकसभा निवडणूकीत शिवसेनेचाच उमेदवार निवडणूक लढवेल. त्यासाठी शिंदे गट व भाजपने युतीधर्म पाळणे गरजेचे आहे. लोकसभेत शिवसेनेचा उमेदवार नसेल तर रायगड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील. त्यामुळे आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करावी, अशी विनंत राजा केणी यांनी केली.
धुसफूस चव्हाट्यावर
ग्रामपंचायत निवडणूकीत अपेक्षित यश न मिळाल्याने वेडेपिसे झालेल्या शिंदे गटाने शेकापची बी टीम भाजप असल्याचा आरोप केला आहे. शेकापच्या बी टीममुळे पराभव पत्करावा लागला असल्याची जोरदार टीका केल्याने शिंदे गट व भाजपमधील धूसफुस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
धैर्यशील पाटील यांच्या अडचणीत वाढ
माजी आ. धैर्यशील पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपला लोकसभेसाठी उमेदवार मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. त्यानंतर चंद्रकांत बावनकुळे यांनी अलिबागमधील कार्यक्रमात अप्रत्यक्षरित्या धैर्यशील पाटील हे लोकसभेचे उमेदवार असल्याचे जहिर केले होते. मात्र रायगड जिल्ह्यात शिंदे गट व भाजपमध्ये कायमच धुसफूस असल्याचे पहायला मिळाले आहे. अशातच शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजा केणी यांनी लोकसभेचा उमेदवार आपलाच असायला हवा, अन्यथा राजीनामे देऊ असा इशारा दिल्याने धैर्यशील पाटील यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

आम्ही लबाड लांडगे नाही; भोईरांचा केणींना टोला
ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. भाजपचे काही कार्यकर्ते या निवडणुकीत सरपंच व सदस्यपदाच्या भुमिकेत होते. काही ठिकाणी उमेदवार निवडूनही आले. दिलीप भोईर बी टीममध्ये कधीही काम करीत नाही. ए टीममध्ये काम करणारा प्रामाणिक व सच्चा कार्यकर्ता आहे. तुमच्यासारखा लबाड लांडगा नाही, असा टोला त्यांनी राजा केणी यांना लगावला.

शिंदे गटाला खासदारकीचे डोहाळे
नीट रहा नाही तर, खाटा टाकू असे महेंद्र दळवी म्हणाले. परंतु आगामी निवडणूकीत खांटांवर झोपविण्याचे काम जनताच करणार आहे. याचे भान दळवींनी ठेवावे. आम्ही पक्षाशी प्रामाणिक आहोत. अलिबागमध्ये शिंदे गटाला खासदारकरीचे डोहाळे लागले आहेत. ती भुमिका पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. आगामी निवडणुकांमध्ये नीट राहिलात तर ठीक नाही तर अजूनही भुमिका घ्यायच्या आहेत, असा इशारा भोईर यांनी थेट आ. महेंद्र दळवींना दिला.
Exit mobile version