राजाभाऊ देसाई स्मृती चषक

भारत पेट्रोलियमची जेतेपदाची हॅटट्रिक

| मुंबई | वृत्तसंस्था |

अनिकेत मानेच्या सुसाट आणि भन्नाट चढायानंतरही ठाणे महानगरपालिका भारत पेट्रोलियमला धक्का देण्यात अपयशी ठरली आणि भारत पेट्रोलियमने ठाणे पालिकेचा थरारक संघर्ष 30-25 असा मोडत स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषकावर सलग तिसऱ्यांदा आपले नाव कोरले. गतवर्षीही त्यांनी आयएसपीएलवर निसटता विजय मिळवत जेतेपद राखले होते तर यंदा टीएमसीला हरवत हॅटट्रिक साजरी केली.

प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीच्या कबड्डीभूमीत उभारलेल्या सीताराम चव्हाण क्रीडानगरीत कबड्डीप्रेमींना अंगावर शहारे आणणारा संघर्ष अनुभवता आला. उपांत्य फेरीच्या लढतीत भारत पेट्रोलियम आणि ठाणे महानगर पालिकेने प्रतिस्पर्धी संघांना संघर्ष करण्याची संधीच दिली नाही. पण एकतर्फी उपांत्य लढतींनी कंटाळलेल्या कबड्डीप्रेमींनी अंतिम सामन्यात रोमांचक मेजवानीचा मनसोक्त आस्वाद घेतला.

Exit mobile version