राजन साळवींच्या नातेवाईकांची होणार चौकशी

| अलिबाग | प्रतिनिधी |

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजापूरमधील आमदार राजन साळवी यांच्या मालमत्ते संदर्भात वर्षभरापासून चौकशी सुरू आहे. आमदार साळवी व त्यांचे कुटुंब यांची वेळोवेळी चौकशी केल्यानंतर साळवी यांचा भाऊ, वहिनी आणि पुतण्या यांना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली होती. मात्र त्यांनी 10 जानेवारीपर्यंत मुदत मागितली असल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या वर्षभरापासून आमदार राजन साळवी व त्यांच्या कुटुंबियांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरु आहे. त्यांच्या आर्थिक व्यवहाराची माहिती या विभागामार्फत घेतली जात आहे. त्यासाठी साळवी यांना अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात वारंवार चौकशीसाठी बोलवले जाते. बुधवार दि.27 रोजी साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. मात्र ते हजर झाले नसल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे. साळवी यांना पुन्हा नोटीस देऊन आठवडाभरापर्यंत चौकशीसाठी बोलवले जाईल, असे पोलिस उप अधीक्षक शशिकांत पाडावे यांनी सांगितले.

आमदार साळवी यांच्या जमीन खरेदी आणि हॉटेलमधील भागीदारीबाबत चौकशीला बोलवण्यात आले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा आमदार राजन साळवी यांच्या मागे चौकशीचा फेरा सुरू झाला आहे. आमदार राजन साळवी यांची जूनमध्ये चौकशी झाली होती. त्यानंतर आता सहा महिन्यानंतर पुन्हा चौकशीचा फेरा सुरू झाला आहे. रायगड लाच लुचपत विभागाचे पोलिस उप अधीक्षक शशिकांत पाडावे यांनी साळवी यांचे भाऊ दीपक साळवी, वाहिनी अनुराधा दीपक साळवी, पुतण्या दुर्गेश दीपक साळवी यांना बुधवारी जमीन खरेदी आणि हॉटेलमधील भागीदारीबाबत सर्व कागदपत्र घेऊन हजर राहण्याबाबत नोटीस दिली होती.

Exit mobile version