राजापूर समुद्र किनारा पर्यटनाला मिळणार चालना

पर्यटन विभागाकडून आंबोळगड, कशेळीसाठी दोन कोटीचा निधी
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
समुद्र किनार्‍यावरील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभागाकडून राजापूर तालुक्यातील आंबोळगड आणि कशेळीसाठी दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यातील साठ लाख रुपये पत्तन विभागाकडे वर्ग करण्यात आले; तर गणपतीपुळेतील जेट बोट क्लबसाठी मंजूर असलेल्या तीन कोटीपैकी एक कोटी 80 लाख वर्ग केले आहेत. पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध झाल्याने एक दिवसाचे पर्यटनस्थळ म्हणून बसलेला शिक्का पुसण्यास मदत होणार आहे.
पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत 2021-22 या आर्थिक वर्षात 46 कोटी 84 लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यातील 14 कोटी 34 लाख 92 हजारांचा निधी जिल्हाधिकार्‍यांकडे वर्ग करण्यात आला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आंबोळगड, गणपतीपुळे आणि कशेळी समुद्रकिनार्‍यांचा समावेश आहे. यामध्ये आंबोळगड (ता. राजापूर) समुद्र किनारी पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा विकसित करून सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
मंजूर झालेल्या कामांमध्ये जोडरस्ता आठ लाख 40 हजार रुपये, पार्किंग सुविधेसाठी 26 लाख 25 हजार रुपये, स्वच्छतागृहांसह इतर सुविधांसाठी 40 लाख रुपये, वीजपुरवठा करण्यासाठी तीन लाख 80 हजार यासह इतर योजनांसाठी 19 लाख 20 हजार रुपये असा एक कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातील 30 लाख रुपये पत्तन विभागाकडे सुपूर्द केले आहेत. कशेळी (ता. राजापूर) येथील किनारी भागात सुविधा उभारण्यासाठी एक कोटी मंजूर केले आहेत. यामध्येही जोडरस्ता, पार्किंग, स्वच्छतागृह, माहिती फलक आणि विद्युत पुरवठा ही कामे केली जाणार आहेत. गणपतीपुळेत जेट बोट क्लब उभारण्यासाठी तीन कोटी तीन लाख रुपये मंजूर केले असून, त्यातील एक कोटी 80 लाखांचा निधी आला आहे.

कशेळी येथील किनार्‍यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. पायाभूत सुविधा उभारल्या गेल्या तर निश्‍चितच पर्यटकांमध्ये वाढ होईल. मंजूर झालेल्या कामांव्यतिरिक्त आणखी काही सुविधांसाठी निधी मिळावा म्हणून राज्य शासनाकडे प्रयत्न करीत आहोत. – दीपक नागले, सदस्य, जिल्हा परिषद, रत्नागिरी

Exit mobile version