| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पोलीस दलात प्रतिष्ठेचा समजला जाणारा पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह पदक देण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. रायगड पोलीस दलात कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक राजेश म्हात्रे यांना हे पदक देऊन गौरव करण्यात आला. नवी मुंबई येथे पार पडलेल्या एका सोहळ्यात अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंखे (आयपीएस) यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
अलिबाग तालुक्यातील आवास या गावातून पोलीस दलात दाखल झालेल्या राजेश म्हात्रे यांचा 31 वर्षांचा सेवाकाळ म्हणजे शिस्त आणि कष्टाचा चालता-बोलता इतिहास आहे. खाकी वर्दीची शान राखताना त्यांना मिळालेली बक्षिसे हा केवळ आकडा नसून, त्यांच्या प्रामाणिकपणावर उमटलेली सरकारी मोहोर आहे. राजेश म्हात्रे यांची ओळख राजा म्हात्रे अशी असून केवळ एक पोलीस म्हणून नाही, तर एक चाणाक्ष व्यक्तिमत्व म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
महाराष्ट्र पोलीस दलात आपल्या कर्तव्याचा दक्ष आणि सेवाभावाचा ठसा उमटवणाऱ्या निवडक शिलेदारांचा दरवर्षी सन्मान केला जातो. सन 2025 च्या अत्यंत प्रतिष्ठेच्या पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह पदकावर रायगड पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर असलेले व सध्या महामार्ग पोलिस मदत केंद्र वाकण येथे वाहतूक विभागात कार्यरत असलेले राजेश सुचित्रा अनंत म्हात्रे उर्फ राजा म्हात्रे यांनी आपले नाव कोरले आहे. नवी मुंबई येथे पार पडलेल्या एका सोहळ्यात अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंखे (आयपीएस) यांच्या हस्ते राजेश सुचित्रा अनंत म्हात्रे यांना हे पदक प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांचा हा सन्मान झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.







