राजमाता जिजाऊ : आदर्श व्यक्तिमत्त्व

 प्रा. मनोज पाटील
जिजाऊ  लखुजीराजे जाधवांची वीरकन्या, शहाजीराजे भोसलेंची वीरपत्नी, उमाबाई साहेबांची आदर्श सुन, शिवबांची आदर्श माता, दोन छत्रपती घडवणारी आणि रयतेची राजमाता होत्या. 12 जानेवारी 1598 मध्ये लखुजीराजे आणि म्हाळसाबाई पोटी सिंधखेड येथे कन्या रत्न जन्माला आली. कन्येचे नाव ठेवण्यात आले जिजाऊ जि म्हणजे जिज्ञासा, ज म्हणजे सतत जागृत असणारी, जिथे जिज्ञासा असते सतत जागृत असते तिथेच उत्कर्ष असते तिच जिजाऊ ! जिजाऊ अत्यंत हुशार आणि पराक्रमी होत्या. जिजाईस मराठी, संस्कृत, कन्नड, अरबी, फारसी आणि उर्दु या सहा भाषा येत होत्या. जिजाईने रामायण, महाभारत, नामदेवांचे अभंग कबीराचे दोहे, कुराण, बायबल यांचे वाचन केले होते. स्वतः घोड्यावर मांड टाकत असत. स्वतःची पाचशे महिलांची फलटण होती.
जिजाईच्या पहिल्या पुत्राचे नाव संभाजीराजे नंतर चार कन्यारत्न झाली. महाराष्ट्रात दुःखाने अश्रुचा पूर जात होता. अश्रु पुसण्यासाठी जिजाई देवीजवळ मागण मागत होती आणि सुयोग आला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर पुत्ररत्न जन्मास आले. बालकाचे नामकरण विधी झाले. बालकाचे नाव ठेवण्यात आले शिवाजी… शिवाजीराजे. शहाजीराजे लढाईच्या धामधूमीत असायचे. बालकांचे पालकत्त्व शहाजीराजांच्या मार्गदर्शनानं जिजाईने स्वीकारले. अगदी बारीक सारीक गोष्टींकडे जिजाई बाळांकडे लक्ष देत होत्या. बाळ धाडसी, पराक्रमी, निर्भय आणि हुशार होईल असे पुरक वातावरण करण्यात जिजाई मग्न असत. तसेच लहानपणापासून बाल शिवबास कामात मग्न ठेवत असत. शिवबा मातीचे हत्ती, घोडे करुन घेत. चेंडू, लपंडाव, आंधळी कोशिंबीर, लाकडाचा भोवरा इ. खेळ होते. वेगवेगळ्या पक्षी, प्राण्यांचे आवाज शिवबा शिकत होते. उंच शिखर दिसल्यावर शिवबा हा गड माझा असे म्हणत.
जिजाई शिवबाला जवळ घेउन रामायण महाभारतातल्या आदर्श कथा सांगत असे. मुलांना श्रवण काय करावे याचा परिपाठ जिजाई देत होती. श्री प्रभुरामाचा आदर्श आणि भगवान श्री कृष्णाच्या राजनितीचे बाळकडू सांगत होती. शिवबा जीवनामध्ये यशस्वी बनायचे असेल तर भगवान श्रीकृष्णाप्रमाणे संवाद कौशल्य साधायला पाहिजे. याचा उपयोग महाराजांना अनेक प्रसंगी झाला असे इतिहासकार लिहितात. शिवाजी असा चपलख शब्द बोलत त्यावर इतरांना निरुतर व्हावे लागे. जिजाईने लहानपणी शिवबा घेऊन शिवनेरी, सिंदखेड, खेड शीवापूर खेड-शिवापूर-बंगळुर, बंगळुर-खेड-शिवापूर असा बराच प्रवास केला. लहानपणी उन, वारा, पाऊस यांना तोंड देण्याची सवय घेतली त्यामुळे शरीर दणकट, राकट, सृदृढ आणि निरोगी बनले. तरुणपणात अनेक दगदगी सहन करण्याची तयारी जिजाईनी बालपणी करुन घेतली. बुद्धीमत्तेत वाढ करण्यासाठी केशव पंडितांकडून चित्र रामायणाचे वाचन करुन घेतले. बाळाची क्षमता ओळखणे गरजेचे असते. ती क्षमता ओळखून ध्येय ठरवायचे असते. शहाजीराजांनी व जिजाऊंनी बाळाची क्षमता ओळखली आणि ध्येय ठरवले. स्वराज्य बाळाचे ध्येय 12 वर्षी ठरले. बाळाबरोबर छोटे मंत्रीमंडठ भगवाध्वज आणि विश्‍ववंदनीय राजमुद्रा घेऊन जिजाई पुण्यात आल्या. पडक्या वाड्याजवळ असणार्‍या गणेश मंदिराचे जिर्णोद्धार केले. तेच आजचे पुण्याचे कसबा गणपती मंदिर होय.
पुण्यात मोठे वाडे पाहून शिवबा माँ साहेबांना म्हणतात, यातील आपला वाडा कोणता?0 यावर त्वरीत माँ साहेब बोलू लागल्या, राजे बांधलेल्या वाड्यात राहत नाहीत, स्वतःसाठी स्वतः राजवाडा बांधतात. संकटाची सवय, स्वकष्ट हे संस्कार जिजाईने दिले. आपणही स्वतः मेहनत, कष्ट केले तर इतिहासाला वारसा जपण्याचा आनंद होईल. वाड्याच्या बांधकामास प्रारंभ झाला आणि लवकरच वाडा उभा राहिला तोच इतिहास प्रसिद्ध शिवबाचा लालमहाल होय.
मुलांची संगत चांगली पाहिजे. शिवबाचे मित्र जिजाईने जोडून दिले. तानाजी, येसाजी, बापूजी, बाजी, नेताजी ई. संगतीमुळे शिवबाने स्वराज्य उभे केले. आपला पाल्य यशस्वी होण्यासाठी पालकाने मित्र तपासून घ्यायला हवे. मुलांना अभ्यास करण्याची सवय आपण लावली पाहिजे. त्यासाठी आपल्या नियोजनात वेळ काढून ठेवला पाहिजे जिजाई स्वतः शिवबाला घेऊन शिकवत असत.
शिवबा एका ठिकाणी म्हणतात, मी जगातील सगळ्यात श्रीमंत आहे. कारण माझी आई माझ्याजवळ पुस्तक वाचण्यासाठी बसते. कष्ट आणि महेनतीची सवय मुलांना आपण लावणे हे जिजाईकडून शिकल पाहिजे. पुण्यात ओसाड जागी जिजाईने नांगर हातात घेतला, त्या नागरास शिवबाचा हात जोडला. तो नांगर चालवून जमिन सुजलाम सुफलाम केली. जमिन पिकती झाली जमिनीत मोत्याचे दाणे पिकू लागले. आपण घेतलेल्या अभ्यासाचे सिहांवलोकन केले पाहिजे. मधून-मधून चाचणी घेतली पाहिजे. जिजाईने 18 व्या वर्षी पहिली परीक्षा घेतली. राझांच्या पाटलांने बदल अंमल केला. न्यायनिवाडाचे काम शिवबाकडे दिले. न्यायदानाचे काम पूर्ण झाले. पाटलांचा चौरंग करण्यात आले. म्हणजे दोन हात आणि दोन पाय कलम करण्यात आले. माँ साहेब म्हणाल्या देहांत प्रायश्‍चित का नाही? शिवबा उतरले देहांत प्रायश्‍चित दिले तर लोक थोड्याच दिवसात विसरतील, पण अशा अवस्थेत पाटलांस राज बघतील परत असा गुन्हा होणार नाही. जिजाई शिवबावर विश्‍वास टाकू लागल्या. जमीन पिकती झाली. पोरीबाळींचे संरक्षण हा राजा करेल म्हणून रयतेचा विश्‍वास निर्माण होऊ लागेल. आपले कार्य योग्य मार्गाने चालू आहे. हा आत्मविश्‍वास शिवबामध्ये वाढू लागला. याचा आनंद जिजाईस होत असे. मित्राच्या संगतीने रायरेश्‍वराच्या मंदिरात स्वराज्याची स्थापना शपथ घेतली.
1646 मध्ये आत्मविश्‍वासाने शिवबाने तोरणागडास तोरण बांधले. जिजाईच्या मुत्सद्दीपणाच्या शिक्षणाने कोंढाणा किल्ला ताब्यात घेतला. स्वसामार्थ्यांने पुरंदरची पहिली लढाई जिकूंन फत्तेखानचा पराभव केला. जिजाईच्या डावपेचाच्या शिक्षणाने प्रतापगडावर अफजलखानास बोलवून वध केला. शिवबा विजयाने कधीही हूरळून जाऊ नकोस आणि पराभवाने खचून जाऊ नको, या जिजाईच्या तत्वामुळे शिवबाने विजयोत्सव साजरे केले नाही. तर प्रतापगडाच्या विजयाने जखम दरबार भरविला. लढाईत जखमी झालेले, कामी आलेल्यांची व्यवस्था केली. मानाचे पान कान्होजी जेधेंना देऊन पुढील पराक्रमासाठी निघाले.
18 दिवसात 11 गड स्वराज्यास जोडले. कठीण प्रसंगात डगमगू नये समस्येवर उपाय शोधावा या जिजाईच्या शिकवणीतून पन्हाळ्याच्या कठणी वेढ्यातून डावपेच टाकून घोडखिंड पावन बाजी प्रभूंनी केले आणि शिवबांनी विशाल गडाकडे प्रस्थान केले. आभ्यासात पठार अवस्था येते, त्या समयी मन स्थिर रहावे खचून जावू नये, या जिजाईच्या बालपणीच्या शिकवणूकीतून पुरंदरचा तह शिवबाने स्वीकारला. अपमान सहन करावा लागला शत्रूच्या जबड्यात शिवबा अडकले. प्रसंगी वाघाचा जबडा फाडण्याची तयारी असावी ऐवढी ताकद पणाला लावली. तसेच संयम असावा, या दोन गोष्टीमुळे बादशाहाच्या हातावर तुरी देऊन शिवबा रायगडास हजर झाले. स्वराज्यास अनेक किल्ले जोडू लागले. स्वराज्य मोठं झाले शिवबा यशस्वी झाले. सर्व परिक्षा उत्तीर्ण झाले. जीवाचे अंतिम ध्येय साध्य झाले.
सोन्याचा दिवस रायगडावर उगवला. अमृताचा वर्षाव होऊ लागला. 6 जून 1674 शिवबा छत्रपती होणार होते. जिजाईच्या आयुष्याच्या व्रताचे जणू पारायण होते. जिजाईचा आनंद गगनात मावेनासा झाला. आज ध्येयाची परिपूर्ती होती. ज्यासाठी अट्टहास होता तो दिवस होता राज्याभिषेक. यावेळी सोहळा पार पडला. शिवबा रयतेचे त्राते छत्रपती जाहले तर माँ साहेब राजमाता झाल्या. जिजाईने धन्य धन्य स्वतःस मानले आता पुढच्या प्रवासात आनंदाने जाण्यास हरकत नाही असे जिजाईस वाटले. त्या  आधी शिवबास विचारले शिवबा एक विचारु का? आईसाहेब असे का म्हणता विचारा… विचार! आणि जिजाई हळूवारपणे म्हणाल्या, शिवबा पुढच्या जन्मी माझ्या पोटी तू यावा अशी ईच्छा आहे.
 आता जिजाई थकल्या व तब्बेत बिघडू लागली. गडावरील गारवा सोसवत नव्हता. शिवबाने आई साहेबांची व्यवस्था पाचाडला केली. 17 जूनचा दिवस उजाडला. राजमाता जिजाऊंची तब्येत जास्तच बिघडली. महाराजांना वार्ता समजली महाराज गड उतार होऊ लागले. पाच-पाच पाऊलांनी गडाची माती कपाळाला लावू लागले. महाराजांना मावळ्यांनी विचारले, महाराज आपण असे का करता? महाराज उत्तरले, गडाच्या मातीतील कण आणि कण राजमातेच्या आउँ साहेबांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे. राजे पाचाडला पोहचले, राजांनी पाहिले. राजमातांना शिवबा दिसताच धन्य झाल्या आणि राजमाता पंचतत्वात विलीन झाल्या. शिवबाने हंबरडा फोडला, माँ साहेब पुढील जन्मी आम्ही तुमच्या पोटी जन्म घेऊ…… माँ साहेब आम्ही तुमच्या पोटी जन्म घेऊ… हे होते पालक आणि पाल्य, राजमाता जिजाई आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदेश नाते, आदर्श पालक म्हणून मोठे योगदान जिजाईचे आहे हे इतिहास कधीही विसरणार नाही.
जय जिजाऊ जय शिवराय 

Exit mobile version