कोल्हापूर | प्रतिनिधी |
भूमी अधिग्रहण कायदा ऊस दराचा मुद्दा, वीज वसुली आदी विषयांवरुन स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. आता शेतकर्यांचे प्रश्न मार्गी लागणार नसतील तर गप्प बसून चालणार नाही, असा इशाराच शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.
महाविकास आघाडी तयार होत असताना अनेकांचे उंबरे झिजवणार्यांपैकी मी होतो. शेतकरी विरोधी धोरण राबवणार्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवावा हा हेतू होता. मात्र, शेतकर्यांचे प्रश्न मार्गी लागणार असतील तर गप्प बसून चालणार नाही. गेल्या दोन वर्षांत ज्या काही गोष्टी चुकीच्या वाटल्या त्या लक्षात आणून देणं महत्वाचं वाटलं. दोन वर्षे हा काळ भरपूर झाला. प्रत्येक वेळी पैसे नाहीत म्हणता. मग मंत्र्यांना गाड्या घ्यायला पैसे आहेत, महागडे प्रोजेक्ट ज्यात कंत्राटदारांचा समावेश आहे ते प्रकल्प कसे राबवता?, कर्जमाफीचं काय झालं? भूमी अधिग्रहण कायदा का आणला? अशी प्रश्नांची सरबत्तीच शेट्टी यांनी केली आहे.






