राजू शेट्टी यांचा आरोप
| शिरोळ | प्रतिनिधी |
अवकाळी पाऊस, खताच्या लिंकिंगमधून होणारी शेतकर्यांची लूट, स्मार्ट मीटरसक्ती, पीक विमा घोटाळा, वाढलेली महागाई यामुळे शेतकर्यांचे व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, महापूर, अवकाळी पाऊस, खताच्या लिंकिंगमधून होणारी शेतकर्यांची लूट, स्मार्ट मीटरविरोधी जनआंदोलन, पीकविमा घोटाळा, कर्जमाफी व ऊसदराच्या पुढील आंदोलनाबाबतची दिशा ठरविण्यासंदर्भात शिरोळ येथील टारे क्लब हाऊसमध्ये तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्य सरकारकडून चळवळी मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. जाती-धर्माच्या नावाखाली लोकांमध्ये फूट पाडून सामान्य जनतेच्या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. सरकारचे धोरण सर्वसामान्य जनता व शेतकरीविरोधी असल्यामुळे कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन सामान्य जनतेला व शेतकर्यांना जागृत केले पाहिजे. स्वाभिमानीच्या आंदोलनाचा राज्य सरकारने धसका घेतला आहे. राज्यातील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री व मंत्र्यांचे दौरे असताना सातत्याने नजरकैदेत ठेवले जात असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. या मेळाव्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी विशाल चौगुले, स्वाभिमानी पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी तानाजी वठारे, तसेच स्वाभिमानी युवा आघाडीच्या तालुकाध्यक्षपदासह विविधपदांच्या नियुक्ती करण्यात आली.