। राफा । वृत्तसंस्था ।
गाझा पट्टीत मदत साहित्याचे वाटप सुरू असलेल्या केंद्राकडे जात असलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांवर इस्राईलच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात 31 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण जखमी झाले आहेत. इस्राईलचा पाठिंबा असलेल्या संस्थेने उभारलेल्या मदतकेंद्रापासून एक किलोमीटर अंतरावर हा गोळीबार झाला आहे. संबंधित संस्थेने गोळीबार झालाच नसल्याचा दावा केला आहे. तर, इस्रायली सैन्याने मात्र गोळीबारातील जखमींच्या स्थितीबाबत माहिती नसल्याचे निवेदन प्रसिद्ध केले आहे. गाझा पट्टीत मदतपुरवठा सुरू झाला असला तरी येथील पॅलेस्टिनी नागरिकांसाठी कोणतेही ठिकाणी सुरक्षित राहिले नसल्याचे दिसून आले आहे. निर्वासितांसाठी सुरक्षित म्हणून जाहीर केलेल्या छावण्यांवरही इस्राईलने हवाई हल्ले केले आहेत. गोळीबार झाल्याच्या ठिकाणापासून जवळच ‘रेड क्रॉस’ संघटनेने सुरू केलेले रुग्णालय असून, येथे किमान 21 मृतदेह आणले गेल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, किमान 175 जखमींवर उपचार करण्यात आले आहेत.