। नागोठणे । प्रतिनिधी ।
रोहा पंचायत समिती अंतर्गत असलेल्या आणि रोहा तालुक्यातील सर्व ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांची नावाजलेली संघटना असलेल्या रोहा तालुका ग्रामसेवक संघटनेच्या कार्याध्यक्षपदी प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असलेले नागोठणे ग्रामपंचायतीचे अभ्यासू ग्रामसेवक राकेश टेमघरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आली आहे.
रोहा तालुका ग्रामसेवक संघटनेची एक महत्त्वपूर्ण बैठक रोहा पंचायत समितीच्या द. ग. तटकरे सभागृहात संपन्न झाली. त्यामध्ये रोहा तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष दीपक चिपळूणकर हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागी कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिलेले दत्तात्रेय सावंत यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर रिक्त झालेल्या कार्याध्यक्षपदी राकेश टेमघरे यांची निवड करण्याची सूचना संघटनेचे सचिव अमोल तांबडे यांनी केली. त्यास दिलीप पाब्रेकर यांनी अनुमोदन देताच राकेश टेमघरे यांची सर्वानुमते 5 वर्षांसाठी बिनविरोध निवड करण्यात आली.
नागोठणे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक राकेश टेमघरे यांची रोहा तालुका ग्रामसेवक संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याचे समजताच नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रियाताई महाडिक, माजी सरपंच व विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक आदींसह सर्व सदस्यांनी ग्रामसेवक राकेश टेमघरे यांचे अभिनंदन केले. दरम्यान नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ कर्मचारी रवींद्र राऊत, दिलीप तेलंगे, संतोष जोशी, अमोल ताडकर, हरेश शिर्के, विनोद घासे, नागोठणे संत सेवा मंडळाचे सचिव आणि प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ऋषिकेश भोय यांच्याकडून ग्रामसेवक राकेश टेमघरे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.