| मुंबई | प्रतिनिधी |
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय शिल्पकलेचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ शिल्पकार पद्मश्री राम सुतार यांचे बुधवारी रात्री निधन झाले. नोएडा येथील त्यांच्या निवासस्थानी रात्री सुमारे 1.30 वाजता त्यांनी वयाच्या 101व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. काळाच्या कसोटीवर टिकून राहात दगडातून शेकडो शिल्पांना आकार देत इतिहास घडवणारे हात आज राम सुतार यांच्या जाण्याने शांत झाले आहेत. नुकतीच त्यांनी (19 फेब्रुवारी) वयाची शंभर वर्षे पूर्ण केली होती. दीर्घायुष्य लाभलेले राम सुतार हे अखेरपर्यंत सृजनशीलतेशी नाते जपणारे व्यक्तिमत्त्व होते. शिल्पकार राम सुतार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार गुरुवारी 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने शिल्पकलेतील एका युगाचा अंत झाला आहे.
भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये उभारलेल्या त्यांच्या भव्य शिल्पाकृतींनी भारतीय शिल्पपरंपरेला जागतिक ओळख मिळवून दिली. स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक राष्ट्रीय नेत्यांची स्मारके, तसेच एकता आणि प्रेरणेचे प्रतीक ठरलेले पुतळे ही त्यांची अमूल्य देणगी मानली जाते. त्यांच्या निधनामुळे भारतीय कला, संस्कृती आणि शिल्पकलेच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
जगभरात 200हून अधिक शिल्पांची निर्मिती करणारे राम सुतार हे नाव केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आदराने घेतले जात होते. दिल्लीतील संसद भवन परिसरात उभारलेली त्यांची शिल्पे आजही भारतीय लोकशाहीची साक्ष देतात. राम सुतार यांना त्यांच्या योगदानाबद्दल पद्मश्री, पद्मभूषण तसेच महाराराष्ट्र भूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होतो. मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन हा पुरस्कार त्यांच्या हाती सोपवला होता.
यावर्षी फेब्रुवारीत राम सुतार यांनी वयाची 100 वर्ष पूर्ण केली. 19 फेब्रुवारी 1915 साली महाराष्ट्रातील गोंडूर गावात एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. नोएडा येथे त्यांनी त्यांचा स्टुडिओ साकारला. 1990 सालापासून ते तेथेच रहात होते. पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते राम सुतार यांनी असंख्य ऐतिहासिक शिल्पे आणि स्मारके निर्माण केली. महात्मा गांधींचे साडेतीनशेहून अधिक पुतळे त्यांच्या हाताने तयार झाले. एवढंच नव्हे तर, अजिंठा-वेरूळ लेण्यांमधील अनेक प्राचीन शिल्पांच्या जीर्णोद्धारातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
छत्रपती संभाजीनगरमधील जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा लेण्यांचे पुनर्जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाकडून 1950 मध्ये महत्त्वाचं काम करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी मॉडेलर म्हणून अनेक शिल्पांना गतवैभव मिळवून देण्यासाठी काम केलं. त्यांचा 1952 मध्ये प्रमिला यांच्याशी विवाह झाला. 1959 मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयात दृकश्राव्य प्रसिद्धी संचालनालय, प्रदर्शन विभागात तांत्रिक सहाय्यक म्हणून कार्यरत होते. मात्र, शिल्पकलेची जास्त आवड असल्यानं त्यांनी नोकरी सोडून स्वतंत्र करिअर निवडणं पसंत केलं.
60 वर्षांत घडवली भव्य शिल्पं
देशभरात राम सुतार यांनी अनेक मोठी शिल्प तयार केली आहेत. जगातील सर्वात उंच, 182 मीटरच उंचीचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा राम सुतार यांच्या आयुष्यातील सर्वात भव्य आणि ऐतिहासिक प्रकल्प मानला जातो. गेल्या 60 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी 200हून अधिक भव्य शिल्पं तयार केली. संसद भवनातील महात्मा गांधी यांची मूर्ती, तसेच तिच्या प्रतिकृती इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया येथे पोहोचल्या. 1953 साली मेयो सुवर्णपदक मिळवणारे राम सुतार हे केवळ शिल्पकार नव्हते, तर भारतीय संस्कृतीचे जागतिक प्रतिनिधी होते. सरदार वल्लभभाई टेल, जवाहरलाल नेहरू, गोविंद वल्लभ पंत यांच्यासह अन्य नेत्यांचीही शिल्पं राम सुतार यांनी घडवली.
सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित
कला क्षेत्रातील योगदानाबद्दल राम सुतार यांना 2016 मध्ये पद्मभूषण आणि 1999 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी आपल्या हातानं विदेशातील महात्मा गांधींचे असंख्य पुतळे घडविल आहेत. संसदेसमोरील महात्मा गांधींचा कांस्य आणि पाषणातील पुतळाही त्यांनी घडवला आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुतळे जगभरात भारताच्या समृद्ध वारशाचे प्रतीके म्हणून उभे राहिलेले आहेत. व्यक्तिमत्त्व राम सुतार यांना राज्य सरकारचा 2024 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे.
दगड आणि संगमरवरी शिल्पकलेवर प्रभुत्व
राम सुतार यांचा जन्म 1925 मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे गरीब सुतार कुटुंबात झाला होता. बालपण अत्यंत कठीण संघर्षातून जात असताना त्यांच्यामधील प्रतिभा त्यांचे गुरुजी श्रीराम जोशी यांनी हेरली. त्यांच्यामधील उदयोन्मुख कलाकार घडविण्यासाठी श्रीराम जोशी यांनी राम यांना मुंबईतील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित केलं. जेजेमधून शिक्षण घेत असताना त्यांच्या उपजत असलेल्या प्रतिभेचा अधिक विकास झाला. राम सुतार जेजे स्कूलमध्ये सातत्यानं प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत राहिले आणि अभ्यासक्रमाच्या शेवटी त्यांना मॉडेलिंगसाठी प्रतिष्ठित असं मेयो सुवर्णपदक मिळवलं. आयुष्यभर त्यांनी चित्रकला आणि मातीकाम कौशल्य शिकविणाऱ्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता बाळगली. कारण, त्यांच्यामुळे त्यांना दगड आणि संगमरवरी शिल्पकलेवर प्रभुत्व मिळवता आलं. असं असलं तरी शिल्पकार राम यांना कांस्य धातुच्या ओतकामाची अधिक आवड होती.
