| मुंबई | प्रतिनिधी |
सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या प्रस्तावाला महाराष्ट्राच्या नगरविकास विभागाकडून बुधवारी (दि.28) मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या जीआरमध्ये मुंबईतील शिवाजी पार्कच्या गेट क्र. 5 जवळ 1.8 मीटर क्यूब स्ट्रक्चर उभारण्याची योजना आहे. तसेच, या स्मारकाच्या देखभालीची जबाबदारी बी. व्ही. कामत मेमोरियल क्रिकेट क्लबकडे देण्यात आली आहे. या स्मारकासाठी शिवाजी पार्क जिमखान्याचे सहाय्यक सचिव सुनील रामचंद्रन यांनी पुढाकार घेतला आहे.
रामचंद्रन म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून मी या प्रकल्पाचा पाठपुरावा करत आहे. आचरेकर सरांनी चार दशकांहून अधिक काळात तेंडुलकर, अजित आगरकर, चंद्रकांत पंडित, विनोद कांबळी, प्रवीण आम्रे आणि रमेश पोवार यांच्यासह असंख्य आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना घडवले आहेत. तसेच, सचिन तेंडुलकर म्हणाला की, आचरेकर सरांचा माझ्या आयुष्यावर मोठा प्रभाव पडला आहे. मी आज त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांच्यावतीने बोलत आहे. त्यांचे आयुष्य शिवाजी पार्कमधील क्रिकेटभोवती फिरले आहे आणि ते पार्कवर कायम रहावे हिच त्यांची इच्छा असेल. आचरेकर सरांचा त्यांच्या कर्मभूमीवर स्मारक उभारण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे मला खूप आनंद झाला आहे.