रामनाथकरांनी साकारला अलिबागचा कुलाबा किल्ला

। सायली पाटील । अलिबाग ।
दिवाळी हा हिंदू सणांमधील महत्त्वाचा सण मानला जातो. आणि दिवाळी म्हटल्यावर गडकिल्ले आलेच. कारण, गडकिल्ले म्हणजे मराठ्यांची खरीखुरी अस्मिता. आणि हीच मराठी अस्मिता जपत अलिबाग मधील रामनाथ येथील गावदेवी मंदीर येथे सन्मित्रमंडळ रामनाथ, अलिबाग यांनी दिवाळीनिमित्त अलिबागची ओळख असलेला कुलाबा किल्ला साकारला आहे. आपल्या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांना अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपला गौरवशाली इतिहास लहान मुलांनी अभ्यासावा याकरीता निर्माण केलेली एक संधी आहे. मराठमोळा असणारा दिवाळीचा सण आणि अशा या मराठमोळ्या सणामध्ये पिढ्यानपिढ्या बांधत असलेले गडकिल्ले बांधणे म्हणजे मराठी परंपरा जपणे होय. सन्मित्रमंडळ रामनाथ यांनी दिवाळीनिमित्त 30 ऑक्टोबर पासूनच या मातीच्या कुलाबा किल्ल्याच्या बांधणीची सुरूवात केली होती. केतन चिरनेरकर, हर्षल पाटील, अभिजीत पाटील, रितेश गुरव, आतिश पालवणकर, सुशांत गुरव, प्रथमेश बोसाळकर, सचिन गुरव, आमरेश शेवडे, सौरभ पालवणकर, सुमित पाटील, छोट्या उस्तादांमध्ये सनी परदेशी, दुर्वांकुर गुरव, श्रीयश चिरनेरकर व सन्मित्रमंडळ रामनाथचे इतर कार्यकर्ते तसेच गावकरी या सर्वांनी मिळून हा कुलाबा किल्ला साकारला आहे. दरवर्षी प्रत्येकजण दिवाळीत आपापल्या घरी स्वतंत्र किल्ला बांधतात. परंतु, यंदा सन्मित्रमंडळ रामनाथ यांनी 1 गाव 1 किल्ला या संकल्पनेतून संपूर्ण रामनाथ गावाचा मिळून एकच कुलाबा किल्ला साकारला होता. आणि 1 गाव 1 किल्ला या संकल्पनेचे हे पहिले वर्ष असल्याने अलिबागची आण, बाण आणि शान असणारा कुलाबा किल्ला साकारून रामनाथकरांनी या संकल्पनेला सुरूवात केली आहे. हा किल्ला पुर्णपणे शेण आणि मातीनेच तयार केला असून येणा-जाणार्‍या पर्यटकांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या किल्ल्याला मिळाल्याचे सन्मित्रमंडळ रामनाथचे सदस्य यांनी सांगितले.

Exit mobile version