| रायगड | प्रतिनिधी |
क्रिकेटच्या खेळात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सज्ज असणाऱ्या युवकांना रामराज विभाग प्रीमिअर लीगने क्रीडा व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. विभागातील तब्बल अडीचशेहून अधिक खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी गेले 4 वर्षे करीत आहे. लीगच्या नीटनेटक्या नियोजनामुळे अल्पावधीत संपूर्ण क्रीडा विश्वाचे लक्ष वेधले आहे. या स्पर्धेत खेळणारे आणि घडणारे क्रिकेटर आयएसपीएल आणि आयपीएल सारख्या स्पर्धांमध्ये निश्चितपणे नावलौकिक करतील, असा विश्वास शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी व्यक्त केला.
रामराजचे माजी सरपंच मोहन धुमाळ पुरस्कृत रामराज विभाग प्रिमिअर लिग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नांगरवाडी गावातील धावीर क्रीडांगणावर करण्यात आले. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.4) चित्रलेखा पाटील यांनी धावीर क्रीडांगण येथे भेट देऊन क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्या बोलत होत्या. त्यांच्यासह व्यासपीठावर मोहन धुमाळ, मधुकर ढेवे, उत्तम रसाळ, अवधूत पाटील, मिहीर नाईक, आमिषा शेळके, निलेश मोरे, प्रियांका पाटील, चंद्रकांत बामणे, राजेंद्र वर्तक, सुनील धुमाळ, महादेव पाटील, गिरीश पाटील, मानसी धुमाळ, नाईक, नारायण गावडे, महेश झावरे, गिरीश ठाकूर, राहुल पाटील व समीर शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, धावीर क्रीडांगण निर्माण करण्यासाठी नांगरवाडी गावाने घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. नांगरवाडी गाव नेहमीच शेतकरी कामगार पक्षाबरोबर एकनिष्ठ राहिलेले आहे. या गावाने नेहमीच संघर्ष केला आहे. संघर्षातून यश निश्चित मिळते. गावाने केलेल्या संघर्षाचे फलित पुढील काळात निश्चित मिळेल. रामराज विभाग नेहमीच शेकापचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळेच शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे या विभागावर अधिक प्रेम आहे. या परिसरातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप नेहमीच कटिबद्ध राहील, असे आश्वासन चित्रलेखा पाटील यांनी दिले.
रामराज विभाग प्रीमिअर लीगने ग्रामीण खेळाडूंना व्यासपीठ दिले: चित्रलेखा पाटील
