| माणगाव | प्रतिनिधी |
ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद माणगाव तालुक्यात शनिवारी (दि.21) सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. या ईदनिमित्त मुस्लिम बांधवानी ईदची मशिदीमध्ये सामुदायिक नमाज (प्रार्थना) अदा केल्यावर गळाभेट आलिंगन देत एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. माणगाव तालुक्यातील जुने माणगाव मस्जिद मोहल्ला, बाजारटेप मोहल्ला, नाणोरे, लोणशी, मोर्बा, साई, निजामपूर, दहिवलीकोंड, दहिवली, तारणा, वडवली, मांजरवणे, नांदवी, पुरार, वणीमलई कोंड, हारकोल, गोरेगाव, टेमपाले, लाखपाले, देवळी, टोळ, टोळ खुर्द आदी सर्वच गावांतून रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. माणगाव नगरपंचायत हद्दीतील जुने माणगाव मस्जिद मोहल्ला येथील जामा मशिदीत हजारोंच्या संख्येने उपस्थित राहत मुस्लिम बांधवानी रमजान ईदची सामुदायिक नमाज अदा केली. यावेळी मौलाना हाजिमिया जामदार यांनी कुराण पठण करून उपस्थित मुस्लिम बांधवाना रमजान ईदचे महत्व सांगितले. या रमजान ईदनिमित्त माणगावमधील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी मुस्लिम बांधवांची प्रत्यक्षात तसेच दूरध्वनी व मोबाईलवरून संदेश पाठवून रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.







