रानबाजिरे धरणाने गाठली धोक्याची पातळी

तहसिलदारांकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

| पोलादपूर | शैलेश पालकर |

यंदा गणेशोत्सवापूर्वीच पोलादपूर तालुक्यातील सरासरी पावसाची नोंद 3 हजार पार झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पोलादपूर तालुक्यातील रानबाजिरे धरणाने पाण्याची धोक्याची पातळी गाठली आहे. पोलादपूर तहसिलदार कपिल घोरपडे यांनी दरडप्रवण व पूररेषेखालील लोकवस्त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पोलादपूर तालुक्यातील सावित्री नदीपात्रावरील देवळे येथील धरण पूर्णपणे उखडून काढण्यात आल्यानंतर नदीच्या प्रवाहावर केवळ रानबाजिरे येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे एकमेव धरण आहे. या धरणामध्ये देवळे धरणापासून यंदा मोठ्या प्रमाणात गाळ व लालमाती वाहून आल्याने धरणाचा गाळ अधिक झाला आहे. अशातच, यंदा मे महिन्यापासून अवकाळी पावसासोबतच मॉन्सूनने आगमन केल्याने रानबाजिरे धरणाच्या बॅकवॉटरचा विसर्ग करण्यात आला नव्हता.

15 ऑगस्टपर्यंत तिरंगी प्रकाशझोतात आकर्षक वाटणारे रानबाजिरे धरण सोमवारी आक्राळविक्राळ रूप घेत ओसंडून वाहू लागले. दुपारी 3 वाजता 57.40 मीटर धरणाच्या पाण्याची पातळी झाली असताना विसर्ग 749.562 घनमीटर प्रतिसेकंद करण्यात आला. यामुळे धरणाच्या विसर्गामुळे सांडव्यातून पाणी सावित्री नदीपात्रातून पोलादपूर महाडच्या दिशेने वाहून लागले. पोलादपूरचे तहसिलदार कपिल घोरपडे यांनी सहायक पोलीस निरिक्षक आनंद रावडे यांच्यासह पोलादपूर शहर, कशेडी घाटासह, राजेवाडी पंढरपूर रस्त्यावरील सवाद फाट्यापर्यंत पाहणी करून नदीपात्रालगतच्या लोकवस्तीसह दरडप्रवण क्षेत्रातील लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश दिले.

पोलादपूर तालुक्यात शनिवारी 128 मीमी. रविवारी 96 मीमी तर सोमवारी 107 मीमी पावसाची नोंद होऊन सोमवारी सकाळी 3080 मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यात तीन हजारी नोंद पार करून आतापर्यंतचा विक्रमी पाऊस ठरला आहे. पोलादपूर तालुक्यातील पळचिल सावरीची वाडी येथे रविवारी महाकाय वृक्ष कोसळल्याने रस्ता वाहतुकीसाठी काही काळ बंद होता. तहसिल कार्यालयातील आपत्तीनिवारण कक्षातर्फे तातडीने जेसीबी पाठवून हे झाड हटविण्यात आले. याखेरिज, गौळवाडीत कोसळलेल्या लालमातीचा ढिगारादेखील हटविण्यात आला आहे. कशेडी घाटात चोळई गावातही कंटेनर कलंडल्याने सोमवारी दुपारी काही काळ वाहनांच्या खुप दूरवर रांगा लागल्या होत्या.

Exit mobile version