राणे तर जिल्ह्याचाही विकास करू शकले नाहीत- आ. दीपक केसरकर

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कुडाळ नगरपंचायतीच्या संदर्भात आ. दीपक केसरकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी संवाद साधताना, नारायण राणे साधा जिल्ह्याचाही विकास करू शकले नाहीत, असा घणाघात केसरकर यांनी केला आहे. केसरकर म्हणाले, नारायण राणे यांनी अनेक मंत्रिपदे भूषविली. पण ते कुडाळच नव्हे, तर जिल्ह्याचासुद्धा विकास करू शकले नाहीत. आजारी असणार्‍या एमआयडीसीला ऊर्जितावस्थेत आणण्याचे काम आम्ही केले आहे. त्यांच्याकडून कुडाळच्या विकासात अजिबात योगदान नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

याशिवाय, विद्यमान नगरपंचायतमध्ये विकासात्मक निधी आणण्यासाठी आमदार नाईक सक्षम होते. पण हा निधी वापरू नये यासाठी या नगरपंचायतने सातत्याने आडमुठे धोरण घेतले. मी या ठिकाणी गार्डनसाठी 5 कोटींचा निधी मंजूर केला होता. शिवसेना महाविकास आघाडीच्या माध्यमातून या उद्योगनगरीचा विकास झाला आहे, हे येथील नागरिकांना माहिती आहे. म्हणूनच योग्य असे 17 उमेदवार आम्ही दिले आहेत. ते 17 ही उमेदवार विजयी होतील, असा विश्‍वासही केसरकरांनी व्यक्त केला आहे.

तसेच, पाच वर्षांपूर्वी कुडाळ हे विरोधी सत्तेकडे होते आणि आता या महागाईच्या विरोधात भाजपकडे जर गेले तर परत कुडाळचा विकास थांबणार आहे. कुडाळच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात द्या, असे आवाहनी त्यांनी केले. कुडाळ नगरपंचायतीच्या 17 जागांपैकी 14 जागांवर शिवसेना व 4 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवतील. काँग्रेसशी बोलणे सुरू असून यदाकदाचित त्यांचा निर्णय बदलल्यास शिवसेनेच्या 14 जागांपैकी काही जागा त्यांना दिल्या जातील, असे आमदार केसरकर, आमदार नाईक यांनी स्पष्ट केले. उमेदवार यादी टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येणार आहे.

Exit mobile version