भाजप नेत्याची केसरकरांवर टिका
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार केसरकर विकासांच्या घोषणा करू लागले आहेत. पण या घोषणा म्हणजे पावसाळी बेडूक असल्याची टिका भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली आहे. यासंबंधी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या परिषदेत ते म्हणाले की, आमदार दीपक केसरकर यांनी आतापर्यंत जिंकलेल्या सर्व निवडणुका या जनतेची निव्वळ फसवणूक करून जिंकलेल्या आहेत. कोट्यवधींच्या वल्गना करीत आहेत. अनेक सरपंच व स्थानिक लोकांची आमच्याकडे रोजगार उपलब्ध करून देतो असे सांगून केलेल्या फसवणुकीची पत्रे आहेत. त्यामुळे आमदार केसरकर यांनी आता तरी जनतेची फसवणूक थांबवावी, अन्यथा तुम्हाला जनतेला आता या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील.
यापुढे दिपक केसरकर यांच्या आश्वासनांचा हवाला देत ते पुढे म्हणाले की, केसरकर यांनी लवकरच जिल्ह्यात 500 कोटींचा प्रकल्प आणणार असल्याची घोषणा केली आहे. यापूर्वीही 2 हजार कोटींचा अम्युजमेंट पार्क, सेट टॉप बॉक्स, चष्माची फॅक्टरी अशा विविध घोषणा केल्या होत्या. ताज, सिदा दी गोवासारखी फायू स्टार हॉटेल उभारण्याचे ही त्यांनी घोषित केले होते. त्यासाठीगोरगरीब लोकांनी कवडीमोलाने आपल्या जमिनीही दिल्या. त्याचप्रमाणे अनेक प्रकल्पांची वेळोवेळी भूमिपूजनही केली होती; मात्र त्यातील एक तरी प्रकल्प किंवा आश्वासन त्यांनी पूर्ण केले काय?
अर्थ राज्यमंत्री व पालकमंत्री असतानाही गेल्या पंधरा वर्षात केसरकर काही करु शकले नाहीत, ते आता काय करणार? असा प्रश्न उपस्थित करत केसरकरांनी दिलेल्या आश्वासनांचे लवकरच प्रदर्शन भरविणार असल्याचा इशाराही तेली यांनी दिला आहे.