मच्छिमारांच्या मागणीनुसारच प्रकल्प आणल्याचे स्पष्टोक्ती
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील आक्षी- साखर येथे ग्रोयान्स बंधारा, जेट्टी पोहच रस्ता आदी कामांचे भूमीपूजन मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. हा प्रकल्प आपल्या मागणीनुसार असल्याचा दावा आमदार दळवी यांनी केला होता. त्यानुसार जाहीरातबाजीदेखील करण्यात आला होती. परंतु, नितेश राणे यांनी आमदारांचे श्रेय फेटाळल्याचे समोर आले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मच्छिमारांच्या मागणीनुसार प्रकल्प आणल्याचे स्पष्टोक्ती केली.
विद्यमान आमदार महेंद्र दळवी यांनी अनेक वेळा वेगवेगळ्या जाहीरात बाजी करून आपणच विकास कामांचा निधी आणल्याचा दिखावा अनेकवेळा केला आहे. त्यामध्ये आक्षी साखर येथे ग्रोयान्स बंधारा, जेट्टी, पोहच रस्ता, व अस्तित्वातील नौकानयन मार्गातील गाळ काढणे या कामासाठी आपणच प्रयत्न केल्याची जाहिरात आमदार दळवी यांनी केली. परंतु, बुधवारी सायंकाळी या कामांच्या भूमीपूजन सोहळ्यानंतर पत्रकारांसोबत संवाद साधताना मंत्री नितेश राणे यांनी हा प्रकल्प मच्छिमारांच्या मागणीनुसार आणले असल्याची स्पष्टोक्ती केली. त्यामुळे आमदारांचा दावा नितेश राणे यांनी मिडीयासमोर फेटाळून लावल्याचे उघड झाले आहे. नितेश राणे यांनी भूमीपूजनाच्या कार्यक्रमात कौतूक करावे असे आमदारांना वाटले होते. परंतु, स्पष्टवक्ते असणाऱ्या नितेश राणे यांनी आमदारांच्या बोलण्यावर फारसे लक्ष दिले नाही. हे संपूर्ण सभेतील नागरिकांनी पाहिले. त्यामुळे आमदारांचा दिखावा तमाम जनतेसमोर उघड झाल्याचे स्पष्ट झाले.
शिंदे गटाला दणका
आक्षी, साखरमधील असंख्य कार्यकर्ते भाजपमध्ये
केंद्रासह राज्यात महायुतीचे सरकार आहे. जिल्ह्यातदेखील भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे गट एकत्र असल्याचे अनेक वेळा भासविले जाते. वेगवेगळ्या कार्यक्रमातून एकत्र येऊन महायूतीत वाद कधीच झाला नाही, असे दाखविले जाते. परंतु, महायूतीमधील भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आले आहे. महायूतीमधील शिंदे गटातील असंख्य कार्यकर्ते आमदारांच्या कारभारावर नाराज होऊन भाजपमध्ये दाखल झाले आहेत. या भागातील अनेकांनी एका कार्यक्रमाच्या दरम्यान भाजपमध्ये प्रवेश करून शिंदे गटाला दणका दिला आहे.





