अलिबाग समुद्रकिनारी रंगणार लायन्स फेस्टीवल

सांस्कृतिक कार्यक्रमांसह सामाजिक, शैक्षणिक उपक्रमाचाही मिळणार आनंद,खाद्य पदार्थ्यांसह वेगवेगळ्या वस्तूंची 170 हून अधिक दुकाने असणार

| अलिबाग | प्रतिनिधी |

स्थानिक व्यवसायिकांना एका छताखाली खाद्य पदार्थांसह वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करता यावी यासाठी लायन्स क्लब अलिबागच्या वतीने लायन्स फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे. 25 ते 29 जानेवारी या कालावधीमध्ये अलिबाग समुद्रकिनारी हा महोत्सव भरविला जाणार आहे.अलिबाग लायन्स क्लबच्या माध्यमातून अलिबाग आणि परिसरामध्ये अनेक सामाजिक, सांस्कृतिक ,शैक्षणिक उपक्रम राबविले जातात .अलिबाग लायन्स क्लब स्थापनेला यावर्षी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. अलिबाग व अलिबाग बाहेरील उद्योजकांना उत्तम बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तसेच ग्राहकांना उत्तमोत्तम विविध वस्तू एका छताखाली मिळाव्यात यासाटी गेल्या अनेक वर्षापासून लायन्स क्लब अलिबाग ‘लायन्स अलिबाग फेस्टिवल’ आयोजित करीत आहे.

अलिबागकरांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे यावर्षी 17 वा लायन्स फेस्टिवल होणार असल्याची माहितीमहोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल म्हात्रे यांनी दिली. मान्यताप्राप्त ज्वेलर्स, सालीटायर इव्हेंट यांचे नामांकित चारचाकी ,दुचाकी गाड्यांचे प्रदर्शन व विक्री हे सुद्धा या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.

फेस्टीवलाचा शुभारंभ 25 जानेवारीला सायंकाळी सहा वाजता शेकाप नेते आ. जयंत पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्षा प्रशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी लायन्स क्लबचे जिल्हा प्रांतपाल अमरचंद शर्मा , प्रथम उपप्रांतपाल एन. आर. परमेश्वरन, द्वितीय प्रांत उपप्रांतपाल संजीव सुर्यवंशी यांची उपस्थिती असणार आहे. सांगता समारंभ 29 जानेवारी रोजी होणार आहे. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाहक चित्रलेखा पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जेएस एम कॉलेजचे अध्यक्ष ॲड.गौतम पाटील, माजी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, अलिबागच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे , जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक आदी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सायमा पद्धतीचे अत्याधुनिक स्टॉल्स
हँगर पद्धतीचे विस्तीर्ण दालन, सायमा पद्धतीचे अत्याधुनिक स्टॉल्स, जागतिक बाजारपेठेत नामांकित ब्रँड असलेल्या मीनल मोहाडीकर यांचे कंजूमर शॉपी या संस्थेचे सहयोग असून 170 हून अधिक स्टॉल्स महोत्सवामध्ये ग्राहकांच्या सेवेत असणार आहेत. 30 पेक्षा अधिक चटकदार व्हेज ,नॉनव्हेज खाद्यपदार्थांचे स्टॉल्स खवय्यांसाठी पर्वणी ठरणार आहेत. कराओके सिंगिंग स्पर्धा, अमित वैद्य प्रस्तुत फॅशन शो, शरीरसौष्ठव स्पर्धा, शिवानी पेट शॉप प्रस्तुत डॉग शो, ऑर्केस्ट्रा असे अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम या महोत्सवाची शोभा वाढवणार आहेत. लायन्स हेल्थ फाऊंडेशनच्या माध्यमातून नेत्रचिकित्सा आणि देहदान आणि अवयव दान यांचे प्रचार प्रसार या महोत्सवातून केला जाणार आहे. अलिबागमधील ग्राहकांनी आणि परिसरातील नागरिकांनी महोत्सवात मोठ्या संख्येने राहण्याचे आवाहन अलिबाग लायन्स क्लबचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केले.

Exit mobile version