मतदारांना आवाहन करणाऱ्या रांगोळ्या
| नेरळ | प्रतिनिधी |
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वत्र मतदार राजाला मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. त्याच माध्यमातून नेरळ परिसरातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे यासाठी रांगोळीचे माध्यमातून मतदारांना आवाहन करण्यासाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. नेरळ येथील बापूराव धारप सभागृहात मोठ्या संख्येने रंगावली कलाकार यांनी रांगोळ्या काढून जनजागृती केली.
‘माझे मत माझा अधिकार’, ‘मी मतदान करणारच’ या घोषवाक्यासह राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार नेरळ येथे मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत विधानसभा मतदारसंघात मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आली. त्यानिमित्त महसूल विभागाच्या नेरळ मंडळ अधिकारी कार्यालयाच्यावतीने रंगावली स्पर्धेचे आयोजन केले होते. नेरळमधील अनेक कलाकारांनी या स्पर्धेत भाग घेत येथील बापूराव धारप सभागृहात रांगोळ्या काढल्या. मतदार राजाला आवाहन करणाऱ्या तसेच मतदानाचा अधिकार आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान केले पाहिजे, अशा आशयाचे मजकूर असलेल्या विविध प्रकारच्या रांगोळ्या कलाकारांनी काढल्या. त्यानंतर या रांगोळ्या पाहण्यासाठी खुल्या करण्यात आल्या असता मावळ लोकसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्जतचे प्रांत अधिकारी अजित नैराळे आणि तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांनी रंगावली प्रदर्शनाला भेट देवून राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमाचे नेरळ मंडळ अधिकारी कार्यालयाने बजावलेल्या या स्पर्धेचे कौतुक केले.
मंडळ अधिकारी संतोष जांभळे यांचे मार्गदर्शन खाली मंडळ कार्यालय क्षेत्रातील तलाठी विकास गायकवाड, उमेश भोरे, अनिल कांबळे, वैशाली मानते, तसेच महसूल विभागाचे कोतवाल अशोक भगत, दिपक पेरणे, सुनिल गायकवाड आणि छगन फराट, दूंदा गायकवाड, अर्चना म्हसे यांनी रंगावली स्पर्धेसाठी मेहनत घेतली. रंगावली कलाकार सुचिता मोहिते, राणी आहिर, निर्मला सुर्वे, यांनी आकर्षक रांगोळ्या काढल्या.
