नागरिकांसह विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडळ यांच्या माध्यमातून रांगोळी प्रदर्शन दरवर्षी भरवण्यात येते. यावर्षी रांगोळी प्रदर्शनाबरोबर रायगड किल्ला चित्र प्रदर्शन आणि व्यंगचित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाला कर्जत शहरातील नागरिक तसेच विद्यार्थ्यांनी गर्दी केली.
छत्रपती शिवाजी मंडळ दरवर्षी दिवाळी सणात रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यावर्षी सुंदर रेखीव रांगोळ्यांचे प्रदर्शन मंडळाने भरवले आहे. या रांगोळी प्रदर्शनात कर्जतमधील मातब्बर कलाकारांनी सहभाग घेतला होता. ज्यात एकूण 22 रांगोळ्यांचा सामावेश आहे. प्रेमानंद महाराज, संभाजी भिडे, सलमान खान, दिलीप प्रभावळकर तसेच अनेक विषयावरील सुंदर रांगोळ्या नेत्रदीपक आहेत. तसेच यावर्षी रांगोळी प्रदर्शनाबरोबरच खास आकर्षण म्हणून किल्ले रायगड चित्र व पुरातन वस्तू प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
शिवशंभो युवा हायकर्स, कर्जततर्फे रायगड किल्ल्याच्या विविध अंगाने काढलेल्या फोटोचे प्रदर्शन तसेच संस्थेने आत्तापर्यंत केलेल्या सर्व मोहिमांचे व शिबिरांच्या फोटोचे प्रदर्शन यात समाविष्ट आहे. शिवप्रेमी शैलेश सातपुते यांना सापडलेल्या रायगड किल्ल्यावरील काही दुर्मिळ वस्तूंचेही छोटेसे प्रदर्शनी भरवण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची जाणीव होऊन साहस निर्माण व्हावे, हा या प्रदर्शनाचा हेतू आहे. याच प्रदर्शनासोबत व्यंगचित्रकार विशाल सुरावकर यांच्या खुमासदार व्यंगचित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात आलेले आहेत. सुरावकरांच्या आत्तापर्यंत गाजलेल्या सर्व व्यंगचित्रांपैकी निवडक 100 व्यंगचित्रांचे प्रदर्शन लावण्यात आलेले आहे. अनेक व्यंगचित्र खुमासदार, बोलकी व राजकीय व सामाजिक समस्याविषयी जाणीव करून देणारी आहेत.





