| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विस्तारित जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि.31) रोजी पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत पक्ष संघटना अधिक सक्षम, सशक्त आणि तळागाळापर्यंत बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी युवा नेतृत्वाला प्राधान्य देत प्रमोद म्हसकर यांच्यावर पेण विधानसभा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. तसेच सामंत यांच्यावर पनवेल, उरण आणि कर्जत परिसरातील युवक संघटनेची जबाबदारी सुपूर्द करण्यात आली. युवकांना अधिकाधिक संधी देत सक्षम नेतृत्वाची नवी फळी उभी करण्याचा पक्षाचा मानस असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
बैठकीस राज्याच्या मंत्री आदिती तटकरे, विधान परिषद उमेदवार अनिकेत तटकरे, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, महिला जिल्हाध्यक्ष उमा मुंडे, स्नेहल जगताप, नगराध्यक्षा वनश्री शेडगे, मुरूड नगराध्यक्षा आराधना दांडेकर, राज्य प्रवक्त्या ॲड. सायली दळवी यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी व नेते उपस्थित होते. याशिवाय जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक आणि विविध स्तरांवरील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.






