| उरण | प्रतिनिधी |
गेल्या अनेक दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे होरपळून निघालेल्या उरण तालुक्यातील नागरिकांना सोमवारी सकाळी अचानक झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. मात्र, हा दिलासा अल्पकाळच टिकला असून, पावसानंतर उष्णता आणि दमट वातावरणात आणखी वाढ झाल्याचे दिसून आले.
सोमवारी सकाळी आठच्या सुमारास तालुक्यातील काही भागांमध्ये अचानक ढग दाटून आले आणि पावसाने हजेरी लावली. उरण शहरात काही मिनिटांसाठी रिमझिम स्वरूपाचा हलका पाऊस पडला. त्यामुळे वातावरणात काही काळ गारवा निर्माण झाला आणि उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.
मात्र, जासई आणि रांजणपाडा परिसरात पावसाने काही क्षणासाठी जोरदार हजेरी लावत चांगलीच बरसात केली. काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक असल्याने परिसरातील तापमानात तात्पुरती घट झाल्याचे जाणवले.
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले होते. अशा परिस्थितीत सकाळी झालेल्या पावसामुळे वातावरण प्रसन्न झाले होते. परंतु, पाऊस थांबताच पुन्हा सूर्याने तडाखा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढून उकाडा आणखी जाणवू लागला. सकाळी काही वेळ गारवा अनुभवायला मिळाला असला तरी दुपारनंतर उष्णतेचे चटके अधिक तीव्र झाल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे पावसामुळे मिळालेला दिलासा क्षणिकच ठरल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, हवामानातील या बदलामुळे पुढील काही दिवसांतही काही भागांत तुरळक पावसाची शक्यता वर्तविली जात असून, नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.






