| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरानला सध्याच्या घडीला नगरपालिकेत ताळमेळ दिसत नसल्याने गावात कोणकोणती कामे सुरू केली आहेत त्याबाबत ठावठिकाणा दिसून येत नाही. तर, दुसरीकडे विनापरवाना कामांना ऊत आल्याचे देखील पाहावयास मिळत आहे. या विनापरवाना कामांना अप्रत्यक्षपणे काही लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्गाचे सहकार्य लाभत असल्याने या कामांवर आक्षेप घेतला तरीसुद्धा अशाप्रकारची कामे युद्धपातळीवर सुरूच आहेत. यामागे मोठ्या प्रमाणावर अर्थकारण झाले असल्याचे सर्वच स्तरातून बोलले जात आहे.
माथेरानमध्ये जानेवारी महिन्यापासून बेबी डिसोझा मार्गावर विनापरवाना जांभ्या दगडातील रस्त्याचे काम सुरू होत असल्याने नगरपालिका विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार यांनी आवाज उठवला होता. त्यामुळे तूर्तास हे काम बंद करण्यात आले होते. सर्व साहित्य नगरपरिषदेने जप्तसुध्दा केले होते. परंतु, सद्यःस्थितीत आता हे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर दिसत आहे. प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे की अशा विनापरवाना कामांना आर्थिक लोभापायी अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत आहेत, असा प्रश्न स्थानिकांना सतावत आहे. नियमबाह्य कामांना सध्याच्या काळात प्रशासन आणि काही लोकप्रतिनिधी हातभार लावत असून, एकीकडे अतिक्रमणवर कारवाईचा दिखावा, तर दुसरीकडे विनापरवाना रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू केली आहेत.
काही सर्वसामान्य स्थानिक लोकांना घराच्या दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी बंदी घालण्यात येते आणि दुसरीकडे धनाढ्य लोकांना बंगल्याच्या कामासाठी लागणारे साहित्य आणण्यास मुभा दिली जात आहे. यामुळे नागरिक द्विधा मनःस्थितीत सापडले आहेत. विशेष म्हणजे, ज्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आणि नगरसेवकांनी याच बेबी डिसोझा मार्गासाठी आकांडतांडव केले होते, तीच मंडळी आता मूग गिळून गप्प का बसले आहेत? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.






