स्पर्धेने दिले अनेक कोहिनूर; 200 पेक्षा अधिक संघ होणार सहभागी
| मुंबई | प्रतिनिधी |
हॅरिस शील्ड हे मुंबईतील एक प्रतिष्ठित आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा आहे, 1897 पासून मुंबई स्कूल गेम्स असोसिएशनद्वारे आयोजित केली जाते. ही स्पर्धा अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटूंना घडवण्यासाठी ओळखली जाते. यात भाग घेणाऱ्या संघांसाठी ही एक मोठी संधी आहे. या स्पर्धेमुळे तरुण खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळते.
क्रिकेट विश्वातील सर्वाधिक जुनी आणि प्रसिद्ध असलेली मुंबई शालेय क्रीडा संघटनेची (एमएसएसए) हॅरिस शील्ड आणि गाईल्स शील्ड ही आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा नवा इतिहास रचणार आहे. या वर्षी प्रथमच हॅरिस शील्डमध्ये 200 पेक्षा अधिक शालेय संघांनी सहभाग नोंदवत सर्वोच्च संघांच्या विक्रमाची नोंद केली आहे. तसेच गाईल्स शील्डमध्येही विक्रमी संघांनी सहभाग नोंदवल्याची माहिती एमएसएसएचे क्रिकेट सचिव नदीम मेमन यांनी दिली. एमएसएसएच्या हॅरिस आणि गाईल्स शील्ड क्रिकेटला जगभरात मानाचे स्थान आहे. मुंबईच्या क्रिकेट संस्कृतीचा अभिमान जागतिक पातळीवर झळकवताना या शालेय स्पर्धांमधून क्रिकेट जगताला अनेक कोहिनूर दिले आहेत.
या वर्षी हॅरिस शील्डमध्ये तब्बल 200 शाळांच्या संघांनी भाग घेतला असून शालेय क्रिकेटच्या इतिहासात हा एक विश्वविक्रमच आहे. तर गाईल्स शील्डलाही 197 उत्साही शाळांनी सहभाग दिला असून, मुंबईच्या गल्ल्यागल्ल्यांतील क्रिकेटच्या मुळाशी असलेल्या जोशाला आणखी बळ मिळाले आहे. स्पर्धेच्या या यशामागे क्रिकेट सचिव नदीम मेमन यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या पुढाकारामुळे शालेय क्रिकेटला आज प्रतिष्ठेचे मैदान आणि सुविधा लाभल्या आहेत. यंदाही या स्पर्धांचे सामने वानखेडे, बॉम्बे जिमखाना, पारशी, हिंदू, इस्लाम आणि पोलीस जिमखाना तसेच सर्व प्रमुख मुंबईच्या मैदानांवर खेळविले जाणार आहेत. तसेच खेळाडूंना पुरस्कार देण्याची प्रथाही गेल्या वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील हॅरिस शिल्ड स्पर्धेतून खेळाडूंनी भारतीय संघामध्ये प्रवेश केला आहे. क्रिकेटचा दिग्गज सचिन तेंडुलकर येथून उदयास आला आणि त्याने भारतीय संघामध्ये स्थान मिळवले. या स्पर्धेत प्रभावी कामगिरी केल्यानंतर विनोद कांबळी, सरफराज खान आणि पृथ्वी शॉ यांनीही भारतीय संघामध्ये स्थान मिळवले. आता या यादीत आणखी एक प्रतिभावान खेळाडू जोडला गेला आहे. हॅरिस शिल्ड स्पर्धेत जनरल एज्युकेशन अकादमीकडून खेळताना आयुष शिंदेने नाबाद 419 धावा केल्या. आयुषने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडला. सचिन आणि विनोद कांबळी यांनी या स्पर्धेत मिळून 664 धावांची विक्रमी भागीदारी केली, ज्यामध्ये सचिनने नाबाद 326 धावा केल्या होत्या.
मुंबईतील शालेय क्रिकेट कधी नव्हते इतके आज मजबूत झाले आहे. हॅरिस आणि गाईल्स शील्ड या केवळ स्पर्धा नाहीत, त्या आहेत हिंदुस्थानातील महान खेळाडूंची नर्सरी आहे. याच मैदानांतून सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अजित वाडेकर यांसारख्या खेळाडूंनी आपला प्रवास सुरू केला.
-नदीम मेमन,
क्रिकेट सचिव






