पारंपरिक कलेला प्रोत्साहन
| बोर्ली पंचतन | वार्ताहर |
रांगोळी आपल्या समृद्ध परंपरेतला एक शुभ संकेत. प्रत्येक सण उत्सवाला घरासमोर रांगोळी काढणं ही आपली प्राचीन परंपरा. पण इतर वेळीसुद्धा घरात किंवा घरासमोर सारवलेल्या जागेवर रांगोळीची दोन बोटं उमटवणं ही आपली संस्कृती. हीच रांगोळी श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन अखंड आगरी समाजाच्या वतीने मंगळवारी (दि.29) नागपंचमीच्या दिवशी स्पर्धात्मक रूपाने साकारण्यात आली.
कला, संस्कृती आणि समृध्दीचं शुभ प्रतिक असणाऱ्या रांगोळीच्या परंपरेबद्दल तरुण पिढीला प्रोत्साहित करण्यासाठी आगरी समाज सभागृहात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये बोर्ली पंचतन, दिघी, कुडगाव, शिस्ते या गावातील 15 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. गावातील विविध समाजाच्या मान्यवरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन कलाकृतींमध्ये विविध रंगांनी जिवंतपणा भरणाऱ्या कलाकारांचं कौतूक केलं.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभलेले माणिक जाधव, सिद्धेश्वर आंजर्लेकर आणि पोर्टेट आर्टिस्ट उमेश धनावडे यांनी स्पर्धेचं अभ्यासपूर्ण परीक्षण केलं. दिघी येथील रोहन पाटील याने साकारलेल्या पार्वती नंदन या रांगोळीला प्रथम क्रमांक, शिस्ते येथील सारंग भायदे याच्या संभाजी महाराजांच्या छावा कलाकृतीला द्वितीय, दिघी येथील विनायक कावळे याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कलाकृतीला तृतीय आणि शिस्ते येथील प्रथमेश कांबळे याने साकारलेल्या शेतकरी आणि विठ्ठल या कलाकृतीने उत्तेजनार्थ चतुर्थ पारितोषिक पटकावलं. तर सृष्टी अनिल पाटील हिने साकारलेल्या रांगोळीला प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आलं. सर्व विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आलं.
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संदीप भायदे यांनी केलं. या स्पर्धेसाठी आर्थिक रूपाने हातभार लावणारे देणगीदार, स्पर्धेमध्ये भाग घेणारे सर्व कलाकार त्याबरोबरच परिक्षकांच्या लाभलेल्या सहकार्याबद्दल बोर्लीपंचतन अखंड आगरी समाज अध्यक्ष वैभव पाटील यांनी उपाध्यक्ष संतोष कांबळे आणि सर्व पदाधिकारी यांच्या वतीने आभार व्यक्त केले. याप्रसंगी अठरा गाव आगरी समाज अध्यक्ष गणेश पाटील, चिंचबादेवी देवस्थान समितीचे सुजित पाटील, सहा खोतींचे पाटील, उद्योजिका भारती धनावडे व समाज बांधव, भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






