जलजीवन योजना कागदावरच; महिलांची पाण्यासाठी वणवण
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील रांजणखार डावली गावात पाणीटंचाईने भीषण स्वरुप धारण केले असून, गेल्या तीन महिन्यांपासून गावात थेंबभरही पाणी नाही. एकीकडे शासन ‘हर घर नल, हर घर जल’चा गवगवा करत असताना, प्रत्यक्षात मात्र या गावातील महिलांना मैलोन्मैल पायपीट करुन पाणी आणावे लागत आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
रांजणखार डावली या गावाला सध्या एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाईपलाईन फुटली असल्याचे कारण पुढे करत एमआयडीसीने हात झटकले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याआधी आठवड्यातून एकदा पाणी दिले जात होते. मात्र, आता महिनोमहिने पाणीच येत नाही, ही गंभीर बाब आहे.
पाण्याच्या कायमस्वरुपी उपायासाठी शासनाने एक कोटी 14 लाख रुपयांची जलजीवन योजना मंजूर केली होती. टाकी, विहीर आणि पाईपलाईनचे काम सुरू करण्यात आले. मात्र, नेहमीप्रमाणे ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ अशी अवस्था या योजनेची झाली आहे. योजना अद्याप अपूर्ण अवस्थेत असून, प्रत्यक्षात ती बारगळली असल्याचे चित्र आहे.
अडीच हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या गावातील ग्रामस्थ गेली चार वर्षे शासनाचे उंबरठे झिजवत आहेत. आश्वासनांखेरीज काहीच मिळाले नाही. संतप्त ग्रामस्थ व महिलांनी यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. त्यानंतर काही दिवस पाणी आले, मात्र पुन्हा ‘नव्याचे नऊ दिवस’ सुरू झाले आहेत.
गावात पाणी पोहोचत नसल्याने महिलांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. लहान मुले, वृद्ध आणि आजारी नागरिकांचे हाल होत असून, प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे. या गावाला सध्या एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा केला जातो. मागील काही महिन्यांपासून आठवड्यातून एक वेळा पाणीपुरवठा केला जात होता. आता महिनोमहिने पाणी गावात पोहोचत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाच्या या गलथान कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत असून, तात्काळ उपाययोजना न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
रांजणखार डावली येथील पाण्याचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून आहे. या गावाला एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा केला जातो. परंतु, गेल्या तीन महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाईपलाईन फुटली असल्याचे कारण सांगून गावात पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. गावात एक कोटी 14 लाख रुपयांची जलजीवन योजना राबविली. परंतु, हे कामही अपूर्ण स्थितीत आहे.
-सुरेश माळी,
ग्रामस्थ
जलजीवन योजनेचे काम पूर्ण झाले आहे. फक्त वीज कनेक्शन आणि एमआयडीसी लिकेज काढण्याचे काम बाकी आहे. स्थानिक प्रशासनाने कार्यवाही करणे आवश्यक आहे.
-निहाल चवरकर,
अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, अलिबाग







