16 फेब्रुवारी ते 5 मार्च दरम्यान साखळी फेरीचे सामने
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
स्थानिक क्रिकेटमध्ये मानाचे स्थान असलेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या बहुप्रतीक्षित हंगामाला 16 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोमवारी जाहीर केले. 5 मार्चपर्यंत या स्पर्धेचे साखळी सामने होतील.
कोरोनामुळे गेल्या वर्षी रणजी स्पर्धेचे आयोजन करणे शक्य झाले नाही. यंदाही 13 जानेवारीपासून 2021-22 वर्षांचा हंगाम सुरू होणे अपेक्षित होते. परंतु देशभरातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. 2019-20 मध्ये झालेल्या अखेरच्या रणजी स्पर्धेतील अंतिम फेरीत सौराष्ट्रने बंगालला नमवले होते. जैव-सुरक्षा परिघात होणार्या या स्पर्धेतील साखळी सामने अहमदाबाद, कोलकाता, कटक, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, बडोदा, थिरुवनंतपुरम आणि राजकोट या नऊ शहरांत खेळवण्यात येतील. स्पर्धेत सहभागी होणार्या 38 संघांपैकी प्रत्येकी चार संघांना आठ गटांत विभागण्यात येणार आहे. तर प्लेट गटात उर्वरित सहा संघांचा समावेश करण्यात येईल.
27 मार्चपासून महाराष्ट्रात ‘आयपीएल’ खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रणजी स्पर्धेच्या आयोजनासाठी महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. दरम्यान रणजी स्पर्धेच्या आयोजनासाठी ‘बीसीसीआय’ने हिरवा कंदिल दर्शवल्यामुळे असंख्य क्रिकेटपटूंनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच या हंगामापासून खेळाडूंच्या मानधनातही वाढ करण्यात आल्यामुळे फक्तलाल चेंडूचेच सामने खेळणार्या खेळाडूंसाठी रणजी स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे.







