रानोमाळ बहरला ‘गौरी’च्या फुलांनी

विविध आकर्षक रंगांची उधळन

। सुधागड । पाली ।

जिल्ह्यात सर्वत्र माळरान, डोंगर उतार व शेताच्या बांधावर आकर्षक तेरड्याची फुले फुलली आहेत. जांभळट, फिकट गुलाबी, तांबडे किंवा पांढरे अशा विविध आकर्षक रंगांची ही फुले सगळ्यांचेच लक्ष वेधत आहेत. गणपतीबरोबर येणार्‍या गौरी मातेला विशेषकरून ही फुले अर्पण केली जातात. यामुळे या झाडाला गौरी किंवा गौरीची फुले किंवा गुल मेहंदी असे म्हटले जाते.

ही फुले येणार्‍या जाणार्‍यांची ही आकर्षक रंगीबेरंगी फुले लक्ष वेधून घेतात. विस्तृत बहरलेली ही मनमोहक फुले मन प्रसन्न करतात. या फुलांचा वापर गणपतीत माटोळीसाठीदेखील केला जातो. चातुर्मासात तेरड्याचे महत्व पूजेसाठी असते. गौरीच्या पुजेत तसेच पिठोरीच्या पुजेतही तेरडा हा लागतोच. पिठोरी अमावस्येला ‘पात्री’ म्हणून तेरडा आणावा लागतो. गौरी गणपतीच्या सणाला पूजेकरिता तेरड्याची पाने व फुले वाहतात.

तेरडा ही वनस्पती बाल्समिनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ‘इंपॅटिएन्स बाल्समिना’ आहे. ती मूळची दक्षिण आशियाच्या भारत आणि म्यानमार देशांतील असून जगभर इंपॅटिएन्स प्रजातीच्या 850 ते 1000 जाती आहेत. भारतात या प्रजातीतील सुमारे 150 जाती आढळतात. ही वनस्पती समुद्रसपाटीपासून सुमारे 1500 मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात, वनांमध्ये झाडाझुडपांच्या खाली वाढलेली आढळते. महाराष्ट्रात ही पश्‍चिम घाट, कोकण व दख्खनच्या पठारी भागांत मोठ्या प्रमाणात आढळते.

तेरडा ही वनस्पती 30-90 सेंमी उंच वाढते. खोड मांसल असून फांद्या आखूड असतात. पाने साधी, सुमारे 15 सेंमी लांब व भाल्यासारखी निमुळती असतात. पानांची मांडणी सर्पिलाकार व कडा दंतूर असून त्यांच्या देठावर ग्रंथी असतात. फुले गुलाबी, एकाकी किंवा झुबक्यांनी पानांच्या बगलेत येतात. परागण कीटकांमार्फत व पक्ष्यांमार्फत होते. बोंडे सुमारे एक सेंमी जाड व लवदार असून त्यांना स्पर्श झाल्यास ती तडकून फुटतात. तेरड्याच्या पानांत नॅफ्थॅक्विनोन, लॉसोन व लॉसोन मिथिल ईथर असे मुख्य क्रियाशील घटक असतात. बियांमध्ये कॅम्फेरॉल (फ्लॅवनॉइड) हा मुख्य घटक असतो.

नाजूक फुले
तेरड्याची फुले अतिशय नाजूक असून पावसाळ्यात माळरान व रस्त्याच्या कडेला याची रोपे आपोआप उगवतात. फुलांचे सिंगलचा तेरडा, डबलचा तेरडा तसेच संकरीत तेरडे असे विविध प्रकार देखील आहेत. या फुलांचे आयुष्य फक्त पाच ते सात दिवस असते.
औषधी आणि अन्य उपयोग
तेरडा हा पित्तशामक असून त्याची फुले पौष्टिक आणि थंड असतात. फिलिपिन्स मध्ये फुलांचा उपयोग कंबर दुखीसाठी केला जातो. फुलांमध्ये काही अँटीबायोटिक सारखे गुण सापडले आहेत ज्यामुळे काही बॅक्टेरिया आणि फंगस नष्ट होतात. काही देशांत मेंदीप्रमाणे तेरड्याच्या पानांनी व फुलांनी हात व नखे रंगवितात. फुले थंडावा देणारी असून ती भाजलेल्या जागी लावतात. आशियातील काही देशांत ही वनस्पती संधिवात, अस्थिभंग आणि बद्धकोष्ठता इत्यादी विकारांवर वापरतात. बियांपासून मिळणारे हिरवट व चिकट तेल स्वयंपाकात व दिव्यासाठी वापरतात.
Exit mobile version